मालवण दि प्रतिनिधी
जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञान व विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा सकारात्मक वापर करून विध्यार्थ्यानी यश संपादन करावे आणि आपल्या कॉलेजचे नावही उज्वल करावे असे आवाहन स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणचे माजी विध्यार्थी आणि पोलीस उपनिरीक्षक वासुदेव वरवडेकर यांनी येथे बोलताना केले
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त ‘सन्मान देशभक्ताचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्यातील सुभेदार हितेश कुमार (गुजरात) व सीएचएम बलवंत सिंग (राजस्थान) या दोन वीर जवानांचा तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पोलीस उपनिरीक्षक वासुदेव वरवडेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी श्री वरवडेकर हे बोलत होते
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सहकार्यवाह संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी, समाजसेविका शिल्पा खोत, न प महिला व बाल कल्याण सभापती सौ अन्वेषा आचरेकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका महानंदा खानोलकर , नगरसेवक ललित चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. राबते माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे , सुनीता जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी एन सी सी विभागाचे असोसिएट एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एन सी सी कॅडेट्सची रँक सेरेमनी देखील उत्साहात पार पडली. यावेळी प्राचार्य के. के. राबते यांनी एन सी सी कॅडेट्सच्या शिस्त, समर्पण व कार्याचे कौतुक करत आर्मी ऑफिसर्सच्या देशसेवेबद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी आर्मी ऑफिसर्सच्या मुलाखतीत सुभेदार हितेश कुमार व सीएचएम बलवंत सिंग यांनी विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. सीमेवरील सुरक्षा व्यवस्था, सैनिकांचे दैनंदिन जीवन, आव्हाने, देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली शिस्त व कर्तव्यभावना याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, नंदन देसाई यांची समयोचित भाषणे झाली
यावेळी ‘राष्ट्रीय एकता, राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी’ भव्य मशाल फेरी पार पडली
