मोबाईलचे परीपूर्ण ज्ञान आवश्यक

एडवोकेट विवेक टोपले : मडुऱ्यात दिशा फाउंडेशनतर्फे मोबाईल वापर व सायबर गुन्हे मार्गदर्शन शिबिर

⚡बांदा ता.२६-: मोबाईलमध्ये मनोरंजन होत असले तरी मोबाईल आपल्याला समाज, कुटुंब, मित्र परिवारापासून वेगळे करत आहे आणि हा सर्वात मोठा धोका आहे. मोबाईलचा वापर जीवनात कशा पद्धतीने करावा हे लक्षात घेत त्यावरील दुष्परिणामावर मात करत त्याचा सदुपयोग कशा पद्धतीने करावा याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

कारण मोबाईल हे मृगजळ असून तुमच्यावर या माध्यमातून अनेकजण गळ टाकून बसलेले असतात. मोबाईलचे अपूर्ण ज्ञान धोकादायक ठरू शकते. त्यामुळे परिपूर्ण ज्ञान त्याचबरोबर सुरक्षाही बाळगणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन, सावंतवाडीतील एडवोकेट विवेक टोपले यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल मडुरा हायस्कूलच्या सांस्कृतिक सभागृहात कामत चॅरिटेबल ट्रस्ट दिशा फाउंडेशन कास तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल वापर व सायबर गुन्हे मार्गदर्शन शिबिरात एडवोकेट टोपले बोलत होते. व्यासपीठावर दिशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मंगल कामत, बांदा सहायक पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, मुख्याध्यापक श्री. वराडकर, बांदा पोलीस कर्मचारी राय शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
एडवोकेट टोपले म्हणाले की, मोबाईल सतत हातात ठेवल्यास आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. अल्पवयीन मुले मोबाईलमुळे वाम मार्गाला जातात. ऑनलाइन शिक्षण घेताना मुले मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करतात यावर पालकांचीही देखरेख असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासापुरताच मोबाईल काळजीपूर्वक वापरून समाजात चांगले चित्र निर्माण करावे, असे एडवोकेट विवेक टोपले यांनी सांगितले.
बांदा पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक समीर भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करत मैदानी खेळ वाढवावे, पुस्तक वाचन करावे. कुटुंबातील सदस्यांचे फोटो व्हाट्सअप डीपी, फेसबुक, इंस्टाग्रामवर ठेवू नये. याचे अनेक दुष्परिणाम होऊन गुन्ह्यात रूपांतर होते. यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षात सहभाग घेऊन शिक्षकांना विचारून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने मोबाईलचा वापर करा. मोबाईल जेवढी सोपी गोष्ट आहे तेवढीच धोकादायक आहे असे समीर भोसले यांनी सांगितले.
पोलीस कर्मचारी राय शिरोडकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुले ही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचीच मुले असतात. त्यामुळे शेतकरी मायबाप काबाडकष्ट करतात व तुमच्या हौसेखातीर मोबाईल देतात. 90 टक्के मुले रात्री 10 नंतर इंटरनेटवर असतात. मोबाईल काळजीपूर्वक वापरल्यास चुकीच्या दिशेने पाऊल पडणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीचे चुकीच्या दिशेने पाऊल पडले तर ग्रामीण भागातील सीसीटीव्ही एकदम जलद गतीने आमच्यापर्यंत पोहोचतात हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे, असे मार्गदर्शन राय शिरोडकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामत चॅरिटेबल ट्रस्ट दिशा फाउंडेशन कासच्या संस्थापक अध्यक्ष मंगल कामत यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका जे.डी. सावंत यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री. वराडकर यांनी मानले.

You cannot copy content of this page