आंबोलीमध्ये निसर्ग पर्यटनावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस

उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: आंबोली मध्ये विविध निसर्ग पर्यटन यावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले.

वनविभाग सावंतवाडीमार्फत आंबोली येथे सिंधूरत्न योजनेंतर्गत तीन दिवसीय गाईड प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सावित्री पालेकर, वनक्षेत्रपाल विद्या घोडके, वन्यप्राणी अभ्यासक गिरीश पंजाबी, फुलपाखरू तज्ज्ञ हेमंत ओगले, उभयचर प्राणी अभ्यासक महादेव उर्फ काका भिसे, वनस्पती अभ्यासक मिलिंद पाटील, मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, हेमंत उगले आदी उपस्थित होते.
उपवनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, आंबोलीमध्ये विविध निसर्ग पर्यटन यावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. त्याचबरोबर पर्यटनासोबतच निसर्ग संवर्धनासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा पुढे येऊन वनमित्र म्हणून काम केल्यास वने वाचून पर्यटन वाढण्यास मदत होईल. तसेच प्राण्यांचा अधिवास अबाधित होईल.
या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून वन्यप्राणी अभ्यासक गिरीश पंजाबी पुढे म्हणाले, वन्यप्राणी त्यांचा अधिवास त्यांचं वास्तव्य कोणत्या प्रकारे ओळखता येईल. तसेच वन्य प्राण्यांना त्रास न होता वन्यप्राणी दाखवून पर्यटन कसे करता येईल. पक्ष निरीक्षण कसे करावे, पक्षांबाबतची माहिती पर्यटकांना कशी द्यावी, याबाबतचे मार्गदर्शन केले.
फुलपाखरू तज्ज्ञ श्री. ओगले यांनी फुलपाखरू व त्यांचे जीवन चक्र याबाबत माहिती दिली. फुलपाखरू कोणत्या झाडावर अंडी घालतात. ते कोणत्या झाडावरून आपले खाद्य घेतात. याबाबत मार्गदर्शन करत पर्यटकांना नेमके कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी नेल्यावर फुलपाखरे जास्त प्रमाणात दिसू शकतील. त्या फुलपाखरांची माहिती कशी देण्यात यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
आंबोली येथील सरपटणारे प्राणी व उभयचर प्राणी अभ्यासक श्री. भिसे यांनीही सरपटणारे प्राणी व उभयचर प्राणी यांचा अधिवास कुठे असतो. तसेच ते कोणत्या वेळी दिसतात ते दाखवताना घ्यायची काळजी त्याची माहिती कशी पर्यटकांना द्यावी. विषारी बिनविषारी साप कसे ओळखावे याबाबत मार्गदर्शन केले.
वनस्पती अभ्यासक श्री. पाटील यांनीही आंबोली व परिसरातील दुर्मिळ वृक्ष त्यांचे उपयोग व त्या वृक्षसंपदेचे संवर्धन कसे करावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.त्याचबरोबर प्रथमेश गावडे यांनी जंगलात फिरत असताना प्रथमोपचार पद्धतीचा अवलंब कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले.
कोल्हापूर येथील मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांनी निसर्ग पर्यटन करत असताना पर्यटकांना गाईड म्हणून फिरवत असताना कोण कोणत्या गोष्टींवर ती भर दिला पाहिजे. कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने पर्यटकांना सांगितल्यानंतर त्या सोप्या पद्धतीने समजतील याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या दरम्यान दोन वेळा गाईड प्रशिक्षणार्थी म्हणून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जंगल सफारी करवण्यात आली. या जंगल सफारी दरम्यान प्रत्यक्षात काही साप फुलपाखरू पक्षी बेडूक यांची माहिती त्यांना देण्यात आली. गाईड म्हणून काम करत असताना जंगलामध्ये प्रत्यक्ष कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे व पर्यटकांना कशाप्रकारे मार्गदर्शन केले पाहिजे. याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांमध्ये एक परीक्षाही घेण्यात आली. ज्यामध्ये वन वन संदर्भात 50 प्रश्न विचारण्यात आले होते या प्रश्न उत्तरातून गाईड यांची नेमणूक करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनीही भविष्यकाळात या प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या गाईड प्रशिक्षण शिबिरास आंबोली, चौकूळ व पारपोली आदी परिसरातून जवळपास 48 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
*सोबत फोटो जोडला आहे.
00000

You cannot copy content of this page