पाडलोस माडाचेगाळव मोरीपूल वाहतुकीस धोकादायक

अनेक वर्षांच्या मागणीकडे आजही दुर्लक्ष : पावसाळ्यात हानी होण्याची शक्यता

⚡बांदा ता.१६-: पाडलोस माडाचेगाळव मोरीपुलाचा अर्धा भाग कोसळून तीन महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु अद्याप याकडे आश्वासन देणाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी व प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले. सद्यस्थितीत पूल वाहतुकीस धोकादायक असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निदान पावसाळ्यापूर्वी तरी पूल वाहतुकीस निर्धोक करावे अशी मागणी माडाचेगाळव ग्रामस्थांनी केली आहे.

डिसेंबर 2022 महिन्यात पाडलोस माडाचेगाळव पूल अचानक खचल्याने चिरे वाहतुक करणारा डंपर कोसळून अपघात झाला होता. सदर पुलाचे बांधकाम तीस वर्षांपूर्वी केलेले असून पूल कमकुवत झाले आहे. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

माडाचेगाळव मधील ग्रामस्थांना वाडीमध्ये जाण्यासाठी याच एकमेव मार्गाचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात हलका जरी पाऊस पडल्यास पूल पाण्याखाली जाते. उंची वाढविण्यासाठी वारंवार मागणी करूनही याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात पूल वाहून गेल्यास वाडीचा मुख्य गावाशी संपर्क तुटणार. विद्यार्थ्यांसह नागरिकांना याचा मोठा फटका बसणार असून लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी व प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देऊन पूल वाहतुकीस निर्धोक करावे अशी मागणी पाडलोस-माडाचेगाळव ग्रामस्थांनी केली आहे.

You cannot copy content of this page