इन्सुली परबवाडी येथील ५०० काजू कलमे आगीत जाळली

पाईप लाईन सुद्धा आगीचे बनली भक्ष्य;१० लाखांचे नुकसान


बांदा ता.१६-:
इन्सुली परबवाडी येथे काजु बागायतीला बुधवारी अज्ञाताकडुन लावण्यात आलेल्या आगीत सुमारे पाचशेहुन अधिक काजू कलमे व पाईपलाईन जळून खाक झाली. ऐन काजू हंगाम सुरू असताना काजू बागायतीला लागलेल्या आगीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या आगीत सात ते आठ शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागून दोन दिवस होत आले तरी शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
इन्सुली परबवाडी येथे बुधवारी दुपारी अज्ञाताकडून काजू बागायतीला आग लावण्यात आली. नेहमीप्रमाणे शिरोडकर कुटुंबीय आपल्या काजू बागेतून दुपारी साडे बाराच्या सुमारास घरी परतले होते दरम्यान घरात जाऊन जेवण करतात म्हणे पर्यंत घराजवळ असलेल्या काजू बागेतून धूर दिसू लागला. यावेळी आग विझविण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली मात्र दुपारच्या वेळी आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझविण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.यावेळी स्थानिकांनी आग विझविण्यासाठी मदत कार्य केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


यात विष्णू शिरोडकर यांनी सहा वर्षापूर्वी या ठिकाणी सुमारे दोनशे काजु कलमे लावली होती गेली दोन वर्षे त्यांना यातून पीक मिळत आहे. त्यातील सुमारे शंभर काजू कलमे जळून खाक झाली. भदू शिरोडकर, संतोष आईर, श्रीधर शिरोडकर, दिलीप परब, महादेव शिरोडकर, दीपक शिरोडकर यांची सर्वांची मिळून सुमारे पाचशे हुन अधिक काजू कलमे तर घोगळे याची माड बागायती जळून खाक झाली.
सध्या राज्य सरकारचे कर्मचारी पेन्शन साठी आंदोलन मध्ये असल्याने शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.दोन दिवस होत आले तरी एकही कर्मचारी याठिकाणी साधी विचारपूस करून गेला नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तर येत्या तातडीने नुकसानीचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष मेस्त्री यांनी केली आहे.

फोटो
आगीत काजू कलमे जळून खाक झाली

You cannot copy content of this page