कुडाळ : ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत नेरूरपार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या विशेष उपस्थितीत वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.
सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत झालेल्या या शिबिरात नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, रक्तदाब व मधुमेह तपासणी, छाती व श्वसन तपासणी, नेत्र तपासणी आदी विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. उपलब्धतेनुसार नागरिकांना मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले.
हे शिबिर शुक्रतारा कला क्रीडा मंडळ (नेरूरपार), वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास (नेरूरपार), कोकण कला व शिक्षण विकास संस्था, ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा आणि आयुष्मान आरोग्य मंदिर (नेरूर क्र. २) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आवश्यक आरोग्य तपासणी व मार्गदर्शन मिळावे, यासाठी अशा उपक्रमांची गरज असून भविष्यातही सामाजिक हिताचे उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नेरूरपार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
