विद्यमान सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
मालवण दि प्रतिनिधी :
ग्रामपंचायत तिरवडे येथील डिसेंबर २०१७ ते २०२२ या कालावधीत झालेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायत खात्यात केवळ सातशे रुपये शिल्लक ठेवले होते. ग्रामपंचायत तिरवडे ची अनेकांची बिले देणे बाकी आहे. कर्मचारी पगार थकले आहेत. पाणीपुरवठा योजना तोट्यात आहे. १५ टक्के व ५ टक्के निधीतून करायचा खर्च बाकी आहे मात्र ग्रामपंचायतकडे पैसेच नाहीत अशी स्थिती आहे. यासह अनेक मुद्दे गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांच्याकडे मांडण्यात आले. २०१७ पूर्वी जी ग्रामपंचायत बॉडी होती तिचा कार्यकाळ संपला होता तेव्हा सुमारे अडीज लाख रक्कम ग्रामपंचायत खाती होती. मात्र मागील बॉडीत सगळाच खडखडाट असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब , सरपंच रेश्मा गावडे, उपसरपंच सुशील गावडे, सदस्य विशाखा गावडे, सुमित मेस्त्री, विनया गावडे, माजी सदस्य विकास गावडे, जयेंद्ररथ परब, संतोष गावडे, दयानंद गावडे, उमेश गावडे, प्रथमेश पोरकर, गाव अध्यक्ष रामचंद्र सावंत यासह अन्य उपस्थित होते.
