⚡मालवण ता.१४-: मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव व शिमगोत्सव सोमवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी दिवसभर दर्शनासह पारंपारिक घुमट वादन, कलावंतीण नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
मांड उत्सवनिमित्त चौकचार मांड येथील चौकचार घुमटी फुलांनी व विद्युत रोषणाईने साजविण्यात आली होती. दिवसभर पूजा अर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे यासाठी भाविकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी चौकचार मित्रमंडळातर्फे चौकचार चरणी सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.
यानंतर रात्री पारंपारिक घुमट वादन, कलावंतीण नृत्य व गीत सादरीकरण पार पडले. यास संगीत साथ सुधीर गोसावी व प्रफुल्ल गोसावी यांची लाभली. त्यानंतर रात्री कलांकुर ग्रुप मालवण यांचा ‘मराठमोळा नजराणा’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कोळीगीत, गोंधळ, भक्तीगीते यांच्यावर आधारित ग्रुप डान्स सादर झाले. तसेच ‘सायलेंस, खटला चालू आहे’ हे विनोदी नाटक सादर झाले. कलाकार सचिन टिकम, शुभदा टिकम, अभय कदम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच स्थानिक बाल कलाकारांचे नृत्याविष्कारही सादर झाले. सूत्रसंचालन सुधीर गोसावी यांनी केले.
यावेळी चौकचार मित्रमंडळाचे अध्यक्ष यशवंत मेतर, माजी नगरसेवक बाळू तारी, लक्ष्मण प्रभू, राजा गावकर, आपा मोरजकर, विनायक मोरजकर, संतोष पराडकर, अभय कदम, राजू वाघ, भूषण मेतर, अरुण आढाव, अजित शेलटलर, सर्वेश पराडकर, नितेश पेडणेकर आदी व इतर उपस्थित होते. मांड उत्सवा निमित्त उद्या दि. १५ रोजी वाडवळ कार्यक्रम होणार असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.
