Headlines

बालहातांनी साकारली दुर्गामातेची मूर्ती…

मळगाव-तेलकाटावाडी येथील बालकलाकारांचा पुढाकार:स्वहस्ते मूर्तीनिर्मिती, सजावट अन पूजनातून जपली परंपरा..

⚡सावंतवाडी ता.१२-: मळगाव-तेलकाटावाडी येथील गंगाराम राऊळ कुटुंबातील चिमुकल्या बालकलाकारांनी आपल्या कल्पकतेला भक्तीची जोड देत स्वहस्ते दुर्गादेवीची मूर्ती साकारण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. स्वतः मूर्ती घडविणे, तिचे सुबक रंगकाम व सजावट करणे आणि विधिवत पूजन करून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा करणे, असा या मुलांचा उपक्रम यंदा सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. लहान वयातच धार्मिक संस्कार, सांघिक भावना आणि सांस्कृतिक परंपरेची जपणूक करणाऱ्या या बालकलाकारांचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

पाच बालकलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग
जिल्ह्यात नवरात्रोत्सवास सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून विविध सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जात आहे. मात्र, मळगाव-तेलकाटावाडी येथील गंगाराम राऊळ कुटुंबातील लहान मुलांनी घरच्या घरी स्वतः दुर्गादेवीची मूर्ती तयार करून तिचे पूजन करण्याची आगळीवेगळी परंपरा जपली आहे. नितीन उत्तम गावकर, हर्षिता सहदेव राऊळ, समीक्षा सहदेव राऊळ, संस्कृती संतोष राऊळ आणि सर्वेश संतोष राऊळ या पाच बालकलाकारांचा या उपक्रमात सक्रीय सहभाग असतो. मूर्तीनिर्मितीपासून सजावट आणि पूजनापर्यंतची सर्व कामे ही मुले उत्साहाने करतात.

गणेशोत्सवानंतरच सुरू होते देवीच्या तयारीची लगबग
गणेश चतुर्थीचा उत्सव संपताच या चिमुकल्यांना नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवाबाबतही त्यांच्या मनात मोठा उत्साह असतो. जवळच असलेल्या गणेश चित्रशाळेतून चिकट माती आणून ही मुले स्वतः दुर्गादेवीची मूर्ती घडवितात. मूर्तीचे कोरीव काम, रंगकाम आणि नक्षीकामही स्वतःच्या कल्पकतेतून पूर्ण करतात. यामध्ये नितीन गावकर आणि हर्षिता राऊळ विशेष मेहनत घेतात, तर समीक्षा राऊळ, संस्कृती राऊळ आणि सर्वेश राऊळ त्यांना उत्साहाने सहकार्य करतात.

सजावट अन् पूजनाची जबाबदारीही बालचमूंकडे
देवीच्या आगमनाच्या आदल्या दिवसापासूनच पूजेची आरास, मंडप सजावट आणि इतर तयारीची लगबग सुरू होते. विशेष म्हणजे, ही सर्व कामे मुले स्वतः पुढाकार घेऊन करतात. त्यांच्या या कार्यात घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते. त्यामुळे मुलांच्या कल्पकतेला वाव मिळण्याबरोबरच त्यांना धार्मिक विधी, नियोजन आणि जबाबदारीचीही जाणीव निर्माण होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या बालचमूने एकत्र येत स्वहस्ते दुर्गादेवीची मूर्ती साकारून तिचे भक्तिभावाने पूजन केले.

नऊ दिवस धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत फुगडी, दांडिया, भजन, रेकॉर्ड डान्स आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून मुलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून उत्सवातील आनंद द्विगुणित होणार आहे.

बालवयातच रुजताहेत संस्कार आणि सांघिक भावना
आजच्या काळात लहान मुलांचा कल विविध आधुनिक उपक्रमांकडे वाढत असताना राऊळ कुटुंबातील या बालकलाकारांनी स्वतःच्या हातांनी दुर्गादेवीची मूर्ती घडवून परंपरा जपण्याचा सुंदर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निः स्वार्थ उपक्रमातून भक्ती, कला, सृजनशीलता आणि संस्कार यांचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे. एकत्रितपणे काम करण्याची वृत्ती, जबाबदारीची जाणीव आणि आपल्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेविषयी आदर अशा मूल्यांची रुजवण या उपक्रमातून होत आहे. बालवयातच परंपरेची ज्योत पुढे नेणाऱ्या या चिमुकल्यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

You cannot copy content of this page