एकट्याने कच्चा बंधारा बांधत जलसंधारणाचा दिला आदर्श:स्वतः झाडी तोडून बंधाऱ्यापर्यंत जाण्यासाठी केला रस्ता; नवरात्रोत्सवानिमित्त सौ. सुजाता पडवळ यांच्या हस्ते सन्मान..

⚡वेंगुर्ला ता.१२-: तुळस जिल्हा परिषद मतदारसंघातील वजराट गावात गुलाबी कासले या महिलेने स्वतः पुढाकार घेत एकट्याने कच्चा बंधारा बांधून जलसंधारणाच्या कार्यात अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी बांधण्यात आलेल्या या कच्च्या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असून, शेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीलाही याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग उपलब्ध नसल्याने गुलाबी कासले यांनी स्वतः झाडी कापून रस्ता तयार केला. त्यांच्या या जिद्दीचे आणि सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक होत आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळस जिल्हा परिषद सदस्य सौ. सुजाता पडवळ यांनी या बंधाऱ्याची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी गुलाबी कासले यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी वजराटच्या सरपंच सौ. भक्ती पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते श्री. आनंद पुराणिक, उदय कासले, उर्मी कासले उपस्थित होते.जलसंधारणासाठी केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता, स्वतःच्या कष्टातून गावाच्या पाणीप्रश्नासाठी योगदान देता येते, हे गुलाबी कासले यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांचा हा उपक्रम जलसंवर्धन, लोकसहभाग आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.*
