Headlines

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला ‘नॅशनल अवॉर्ड २०२६’ जाहीर

सामाजिक कार्याची दखल; ३० ऑक्टोबरला सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सन्मान सोहळा

बांदा/प्रतिनिधी
रक्तदान चळवळ आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बॉम्बे ब्लडग्रुप ऑर्गनायझर, तासगाव (जि. सांगली) यांच्यावतीने सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा ‘नॅशनल अवॉर्ड २०२६’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे. संस्थेच्या सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने जिल्ह्यातील रक्तदान चळवळीला आणखी बळ मिळणार आहे.
बॉम्बे ब्लडग्रुप ऑर्गनायझरचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव यांनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्याशी संपर्क साधून पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. तसेच सन्मान सोहळ्याचे निमंत्रणही दिले आहे. येत्या ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तासगाव, जिल्हा सांगली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
या पुरस्कारासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य २९ ऑक्टोबर रोजी तासगावकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी उपस्थितीबाबतचे नियोजन निश्चित करून कळवावे, असे आवाहन प्रकाश तेंडोलकर यांनी केले आहे. सर्व तालुकाध्यक्ष आणि सचिवांनी आपल्या उपस्थितीची माहिती वेळेत द्यावी, जेणेकरून पुरस्कार सोहळ्यासाठीचे नियोजन करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदानाबाबत जनजागृती करणे, गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, अशा कार्यांना या सन्मानामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे.

You cannot copy content of this page