मालवण (प्रतिनिधी)

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सेवाग्राम वर्धा येथे नुकतेच राज्यातील सक्रिय कार्यकर्त्यांसाठी प्रा. श्याम मानवांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसाचे भांडाफोड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सिंधुदुर्गातील अभाअनिसच्या कार्यकर्त्यांनी या शिबिरात सहभागी होत भांडाफोड प्रशिक्षण घेतले.
या शिबिरात सिंधुदुर्ग जिल्हा संघटक विजय चौकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सक्रिय कार्यकर्ते उज्वला येळावीकर, स्नेहा महाडिक, यशवंत भोसले, महेंद्र कदम, जयराम डामरे, विजय जाधव, श्रीकांत नार्वेकर सहभागी झाले होते. या शिबिरात देशभरातील दिडशे सक्रिय कार्यकर्त्यांनाच सहभागी करून घेण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबिरात प्रा. श्याम मानव यांनी समिती स्थापनेपासून केलेल्या भांडाफोडीची थोडक्यात माहिती दिली. तसेच भांडाफोड म्हणजे काय? भांडाफोडीची पूर्व तयारी कशी करावी? भांडाफोडीचे प्रकार कोणते? भांडाफोडीसाठी उपयुक्त साधने कोणती? माहिती कशी मिळवायची ? ती कशी संकलित करावयाची ? भांडाफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांची वैशिष्ट्ये काय असावीत ? प्राधान्यक्रमाने प्रथम भांडाफोड कोणते करावयाचे? भांडाफोड करताना घ्यावयाची काळजी, ज्योतिषांचे भांडाफोड करताना घ्यावयाची काळजी, जादूटोणा विरोधी कायद्यामधील तरतुदी, औषधी व चमत्कारी उपचार कायद्यामधील तरतुदी, एखाद्या भोंदूबाबाने आवाहन स्विकारल्या नंतर कोणती प्रक्रिया राबवायची , कोणती आवाहने स्विकारु नयेत, भानामती कशी ओळखावी, त्याचे प्रकार कोणते,भोंदू बाबांकडून स्त्रियांचे होणारे शोषण कसे थांबवावे इत्यादीचे सखोल मार्गदर्शन प्रा. श्याम मानव यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भोंदूबाबांचे प्रमाण वाडीवस्तीत वाढत असून त्यांच्यापासून सर्वसामान्य जनतेचे शोषण कसे थांबविता येईल यासाठी पुढील काळात शिबिरात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्यात येईल व जास्तीत जास्त भोंदूबाबांचे भांडाफोड करण्यात येईल, असे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी सांगितले दिले आहे. तरी सुजाण नागरीकांनी आपआपल्या परिसरात आपल्यात अलौकिक शक्ती आहे, मी कोणाचा तरी अवतार आहे, मला भूत, भविष्य, वर्तमान ओळखता येते, त्यावर उपाय सांगता येतात, मला अनेकांचे रोग निदान करता येते, त्यावर उपायही करता येतात असे दावे करणारे भोंदूबाबा आपल्या परिसरात असतील तर त्याची माहिती नजिकच्या पोलिस ठाण्यात अथवा अभाअंनिसच्या कार्यकर्त्यांना द्यावी, असे आवाहनही श्री. चौकेकर यांनी केले आहे.
