⚡मालवण ता.१२-: राज्यातील शिंदे – भाजपा सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मालवण तालुक्यासाठी मंजूर झालेला निधी हा आपल्याच पाठपुराव्यातून मंजूर झाल्याचा दावा आमदार वैभव नाईक व त्यांचा कंपू करत आहे. हा निधी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या शिफारसीमुळेच मंजूर झाला असून आम. नाईक यांचा दावा हास्यास्पद आहे. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी आपल्या खासदार व आमदार निधीच्या व्यतिरिक्त कोणत्याही निधीवर दावा करू नये, निधी मंजुरीबाबत आम. नाईक यांनी खोटे दावे करून जनतेची दिशाभूल करू नये, असे भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मालवण येथील भाजपा कार्यालयात तालुका भाजपची बैठक संपन्न झाली. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचलक बाबा परब, तालुका खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष राजन गावकर, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, महेंद्र चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले, यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम. वैभव नाईक यांनी निधी आणला नाही. आता शिंदे – भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर केल्यावर त्यातील मालवणमधील कामांसाठी मंजूर असलेला निधी आपल्यामुळे आल्याचे आम. नाईक सांगत आहेत, सर्व कामांवर आपला दावा करत आहेत. याबाबतचे दावे करणारे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करावे, असेही चिंदरकर म्हणाले.
यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक गेल्या दहा वर्षात मालवण मध्ये एक इंचही सागरी धूपप्रतिबंधक बंधारा बांधू शकले नाही. यापूर्वी नारायण राणे यांच्या माध्यमातून चिवला बीच, दांडी व राजकोट येथे बंधारा कम रस्ता झाल्याने तेथील किनारपट्टी सागरी अतिक्रमणापासून सुरक्षित होऊन आज त्याठिकाणी पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. हे बंधारे त्यावेळी आम्हीच मागणी केल्यामुळे राणे यांच्या प्रयत्नाने झाले होते. दांडी येथे उर्वरित किनारपट्टीवर देखील बंधारा कम रस्ता होणे आवश्यक असताना आम. नाईक यांनी त्याठिकाणी केवळ दगडी बंधारा बांधण्याचा घाट घातला आहे. त्यास दांडी वासियांचा विरोध आहे. ही बाब आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणली असून त्यांच्याकडून या बंधाऱ्याबाबत निश्चित योग्य ती कार्यवाही होईल, आम. नाईक व त्यांच्या चमच्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचे काम बंद करावे, असेही सुदेश आचरेकर म्हणाले.
यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, आम. वैभव नाईक हे आपण निधी आणल्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. विकासकामांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेली पत्रे दाखवून निधी आपल्यामुळे आल्याचे दाखवण्याचा खोटा प्रयत्न आम. नाईक करत आहेत. धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या ९५ टक्के कामांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिफारस पत्र आणि पालकमंत्र्यांचे मंजुरीचे पत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत. मच्छिमारांच्या विकासासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या सक्षम नेतृत्वाने २९५ कोटीचा निधी जाहीर केला आहे, असेही ते म्हणाले.
