दांडीप्रमाणेच देवबाग किनाऱ्यावरही बंधारा होण्यासाठी प्रयत्नशील – ब्रिगेडीयर सुधीर सावंत

⚡मालवण ता.२२-: देवबाग हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे. देवबागचा पूर्णपणे विकास करण्याचे नियोजन आम्ही केले असून दांडी प्रमाणेच देवबागच्या संपूर्ण किनारपट्टीवर बंधारा बांधण्यासाठी तसेच देवबाग खाडीतील नष्ट होत चाललेले त्सुनामी आयलंड फ्लोटिंग आयलंडच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी मालवण येथे दिली.

शिवसेना पक्षाचे नेते ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत देवबाग गावाची पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर, पराग खोत, महिला उपजिल्हा संघटक नीलम शिन्दे, बाळू नाटेकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी सुधीर सावंत म्हणाले, देवबाग किनाऱ्यावर बंधारा होण्याच्या दृष्टीने आज आम्ही पाहणी केली असून बंदर विभागाला देवबाग किनाऱ्याचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसें आदेश मुख्यमंत्री ना. शिंदे यांनीही दिले आहेत. पर्यटन विकास करताना पर्यटन हे स्थानिकांना रोजगार देणारे तसेच पर्यटकांना चांगली सेवा देणारे हवे. येथील निवास न्याहारी योजना उच्च दर्जाची होणे आवश्यक आहे. हॉटेल्सना ज्याप्रमाणे स्टार दिले जातात तशी स्टार प्रमाण योजना निवास न्याहारी मध्ये राबवून शासनाकडून दर निश्चित झाले पाहिजेत. पर्यटनाशी यासारख्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे, असेही सुधीर सावंत म्हणाले.

आज पर्ससीन व एलईडी लाईट सारख्या मासेमारीमुळे मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. मासे मिळणे मुश्किल झाले आहेत. माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीत त्यावेळी एनसीडीसी योजनेतून ट्रॉलर देऊन चूक केली. त्याचा विपरीत परिणाम आज दिसत आहे. म्हणूनच मासेमारी विषयक विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यासाठी पुढील महिन्यात चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मच्छिमारांचे प्रश्न सोडवून त्यांचे कल्याण करण्यास प्रयत्नशील आहेत असेही सुधीर सावंत यांनी यावेळी सांगितले.

मालवण शहरातील भुयारी गटार योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही. ती कां पूर्ण झाली नाही याची आम्ही चौकशी करणार आहोत. मालवण शहरात घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नाहीय. यासाठी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना घेऊन कचरा व्यवस्थापनाबाबत ठोस कार्यक्रम आम्ही जाहीर करणार असून यासाठी नगरोत्थान योजनेतून २ कोटीचा निधी मिळावा अशी मागणी शासनाकडे करणार आहोत. मालवणातील विविध प्रश्नांवर नागरिकांची बैठक घेणार आहोत, असेही सुधीर सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page