Headlines

मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन होणे महत्वाचे – प्रा. अंकुश सारंग

⚡मालवण ता.०१-: मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मात्र मराठी भाषा संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातून मराठीचा जागर झाला पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन होणे महत्वाचे, असे प्रतिपादन प्रा. डॉ अंकुश सारंग यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. सारंग हे बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, मराठी विभाग प्रमुख प्रा. कैलास राबते, प्रा. डॉ. उज्वला सामंत, प्रा. बी. एच. चौगुले आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना प्रा. राबते यांनी मराठी भाषेची गौरवशाली परंपरा, मराठीचा इतिहास व मराठी भाषा टिकविण्यासाठी संतांनी, साहित्यिकांनी दिलेले योगदान याबाबत माहिती दिली. तर प्रा. उज्वला सामंत यांनी मराठी संवर्धनासाठी एक दिवसाचा कार्यक्रम मर्यादित न ठेवता प्रत्येकाने प्रयत्न करून यातील व्यापाकपणा वाढला पाहिजे असे सांगितले. तर प्राचार्या डॉ. ठाकूर यांनी आपण जी भाषा बोलतो त्या मराठी भाषेतील ग्रंथ भांडार, साहित्य, भाषेतील सौंदर्य, आणि मराठीतील थोर साहित्यिकांचे विचार आत्मसात करणे आजच्या काळात महत्वाचे आहे, असे सांगितले.

यावेळी प्रा. एच. एम. चौगले, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. सोनवडेकर, प्रा. पी. बी. खरात यांसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. राबते यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. चौगुले यांनी केले.

You cannot copy content of this page