विनापरवाना वाळू वाहतूक करताना बांदा पोलिसांची ४ डंपरवर कारवाई…

तब्बल ४० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

⚡बांदा ता.२१-:
बांदा दाणोली मार्गावर विलवडे तिठा येथे विनापरवाना वाळू चोरून नेताना बांदा पोलिसांनी ४ डंपरवर कारवाई करत तब्बल ४० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ४ चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार बांदा दाणोली मार्गावर नाकाबंदी आणि कोबींग ऑपरेशन सुरु होते. बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय जाधव, हवालदार रामचंद्र तेली, सुधीर बर्डे, संजय हुंबे, विजय गोसावी यांचे पथक गस्तीवर होते.
विलवडे तिठा येथे दाणोली मधून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु होती. त्यावेळी डंपर मधून विनापरवाना बेकायद वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहतुकीचा तसेच रॉयल्टी भरल्याचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे पोलीस निरीक्षक काळे यांनी विनापरवाना बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या एमएच ०७ एक्स १९८२, जीए ०४ टी ३३६१, टीएन ६५ एजे ६१४५, एमएच ०७ एक्स ००७१ या डम्परवर कारवाई केली. एकूण १२ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याप्रकरणी चालक ऋत्विक प्रदीप महाले (रा. साळ पुनर्वसन, बिचोली, गोवा), दादू विलास काळसेकर (रा. काळसे, मालवण), गौरव लक्ष्मण राणे (रा. माडखोल सावंतवाडी), अक्षय धाकू कोकरे (रा. नेमळे, सावंतवाडी) यांच्यावर भादवी कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एकूण ४० लाख ७२ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.

You cannot copy content of this page