बीओटी नकोच ..कुरिअर सेवा त्वरित सुरू करावी:भाई चव्हाण
⚡कणकवली ता.१०-: एकेकाळी प्रवासी सेवेत एसटीची मक्तेदारी होती. राज्यात प्रवाश्यांची दैनंदिन संख्या एक कोटीच्या वर होती. आता ती २५ लाखाच्या आसपास आली आहे. या परिस्थितीत आता रा. प. महामंडळाने मोठ्या गाड्यांचे पांढरे हत्ती पोसणे बंद करावेत. त्याऐवजी गोवा आदीं राज्यांप्रमाणे “मिनी बसेस” रस्त्यावर आणाव्यात, बीओटी ऐवजी रा. प. ने स्वतः स्थानके बांधावीत. अशी सूचना आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी केले आहे.
प्रवासी संख्या घटल्याने एसटीच्या उत्पन्नातही कमालीची घट झाली आहे. दैनंदिन उत्पन्नापेक्षा खर्च १०- १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक होत आहे. दर महा ३०० हून अधिक कोटी रुपये नुकसान होत आहे. कर्मचार्यांचे पगारही वेळेवर देणे शक्य होत नाहीत. त्यामुळे तो भरडला जात आहे. तर प्रवासी संख्या २५ टक्यांवर आल्याने राज्यातील बस स्थानकांतील व्यवसायीकांचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले असून तोही मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे रा. प. ने उत्पन्न वाढीसाठी स्वतः कुरिअर सेवा सुरू करावी, बीओटी ऐवजी स्वतः अद्यावत स्थानके उभारावीत, आदीं सूचना चव्हाण यांनी यावेळी केल्या आहे.
आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या साप्ताहिक झूम बैठकीत एसटीच्या सद्य परिस्थितीवर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण यांनी एसटी वाचविण्याच्या दृष्टीने या सूचना केल्या आहेत. यावेळी मातृतीर्थ बुलढाणा येथील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे-पाटील आणि कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
राज्य सरकार एसटीवर देशातील सर्वाधिक असा १७ टक्के प्रवासी कर आकारते. शिवाय सत्तेवर येणारे सत्ताधारी मतांच्या बेगमीसाठी प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलतींची खैरात कायमच करतात. अलिकडे तर ७५ वर्षांवरील नागरिकांना सहसकट मोफत प्रवासाची सवलत दिली आहे, असे सांगून ते म्हणाले, आमचा सवलतींना अजिबात विरोध नाही. मात्र हजारों रुपयांचे दरमहा निवृत्ती वेतन घेणार सरकारी-निमसरकारी कर्मचार्यांसह गलेलठ्ठ धनिकही या योजनेच्या फुकट प्रवासाचा लाभ घेताना दिसत आहेत. त्यामुळे या सवलतीच्या बाबतीत निकष ठरविणे गरजेचे आहे. तसेच या सवलतींमुळे एसटीवर पडणारा बोजा शासनाने रा. प. महामंडळांच्या भरपाई पोटी दरमहा देणे आवश्यक आहे.
रा प. महामंडळाकडे राज्यभरात मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता आहेत. तत्कालीन शेतकर्यांनी राज्याच्या विकासाला चालना मिळेल या भावनेपोटी मोफत, बक्षीस स्वरूपात अथवा अल्प मोबदल्यात रा. प. ला जमीनी दिल्यात. आज या जमीनींच्या किमंती गगनभरारी मारताना दिसत आहेत, असे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले, अशा परिस्थितीत रा. प. ने या जमिनींवर स्वतः स्थानके, व्यापारी संकुले बांधावीत. वाजवी दरात सामान्यांना प्रवासी सेवा द्यावी, अशाही सूचना केल्या आहेत.
सुमारे २० वर्षांपूर्वी एसटीची दैनंदिन प्रवासी संख्या एक कोटीच्या वर होती. मात्र जागतिकीकरणामुळे प्रवाशांना पर्यायी वाहतूक साधणे उपलब्ध होत गेली. खाजगी लक्झरी गाड्यांना टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी परवाना नसताना सद्या खुलेआम ही “सेवा” राजकीय वरदहस्तामुळे सुरू आहे. वाहतूकीसाठी
केवळ ६ बैठकांचा परवाना असणार्या डमडम दुप्पट प्रवासी नेऊ लागलेत. अनेकांच्या दारात चारचाकी गाड्या आल्यात. दैनंदिन मजूरीवर काम करणार्या आणि दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कामगारांनी प्रवास करणे सुलभ व्हावे म्हणून दुचाकी खरेदी केल्यात. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सहा महिने लांबलेल्या प्रवाशांनी पर्यायी वाहतूकीची साधने मिळालीत , असे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले, या सर्वं कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून आता एसटीकडे केवळ २५ टक्के प्रवासी वर्ग उरला आहे. त्यातही विद्यार्थी सवलतीसह अन्य सवलती असणार्यांची संख्याही कमालीची आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे.
अशा परिस्थितीत रा. प. महामंडळाच्या प्रशासनाने खर्च कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. प्रवाश्यांच्या संख्येत घट झाल्याने खेडोपाड्यांत ४४ आसनी बसेसचे पांढरे हत्ती पोसण्यापेक्षा मिनी बसेस रस्त्यावर आणाव्यात. प्रवासी भारमान अपेक्षित नसलेल्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द कराव्यात. प्रवासी कर कमी करून तिकिटाचे दर खाजगी लक्झरी गाड्यांपेक्षा कमी करावेत. एसटीकडे सद्य परिस्थितीत असलेल्या जादा कर्मचार्यांच्या माध्यमातून कुरिअर, माल वाहतूक सेवा आदींकडे जास्त लक्ष द्यावे. आदी सूचना या बैठकीत केल्या. ॲड. सतीशचंद्र रोठे-पाटील यांच्यासह उपस्थितांनी यावेळी उपयुक्त सूचना केल्यात.
