रेणुका दांडेकर;शिवाजी वाचन मंदिरच्या शतकमहोत्सवाची सांगता
मालवण (प्रतिनिधी)
वाचन हा एक संस्कार आहे आणि वाचनालय हे सरस्वतीचे मंदिर आहे. स्वातंत्र्यापूर्वी विचारांनी पेटलेल्या काळात मालवण सारख्या ठिकाणी शिवाजी वाचन मंदिराची सुरुवात होऊन गेल्या शंभर वर्षात या वाचनालयाने अनेक पिढ्या घडविल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट असून शिवाजी वाचन मंदिराच्या रूपाने मालवणात ज्ञानाची बँक आहे, असे प्रतिपादन दापोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुका दांडेकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिराचे शतक महोत्सवी वर्ष विविध कार्यक्रमांनी साजरे झाले. या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आज सायंकाळी पार पडला. या समारंभाचे उद्घाटन प्रमुख अतिथी रेणुका दांडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरवस्तीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी समारंभाचे अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, शिवाजी वाचन मंदिरच्या अध्यक्षा सौ. मेधा शेवडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, कार्यवाह सौ. वैदेही सारंग, कोषाध्यक्ष रत्नाकर कोळंबकर, श्रीधर काळे, रुजारिओ पिंटो आदी उपस्थित होते.
प्रारंभी श्रीधर काळे यांनी प्रास्ताविक करत शिवाजी वाचन मंदिराच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी वाचनालयासाठी सहकार्य करणाऱ्या आर्किटेक्चर कौसिफ मेमन, ध्वनी व्यवस्थापक बाळा आचरेकर, कलाशिक्षक श्री. गिरकर, उद्योजक प्रशांत कामत, सिव्हिल इंजिनियर अमित इब्रामपुरकर यांचा मान्यवरांच्या सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या स्मरणिका मुखपृष्ठ चित्रकला स्पर्धेतील विजेते प्रथम -विनिता पांजरी, द्वितीय – चंद्रशेखर कोचरेकर, तृतीय- मंदार शिरोडकर यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी वाचनालयाच्या शतकोत्सव स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी रेणुका दांडेकर म्हणाल्या, बदलत्या काळानुसार वाचनाची माध्यमे बदलली आहेत, त्यामुळे कोणी वाचत नाही हे म्हणणे योग्य नाही. आजच्या वाचनाचे स्वरूप व विषय वेगळे आहेत. मुलेही वाचत असून त्यांना काय वाचायला आवडते जे जाणून घ्यायला आपण कमी पडत आहोत. वाचन हा संस्कार असून तो मुलांना देण्यात आपण कमी पडत आहोत. वाचन संस्कृती टिकवायची असेल तर जे वाचत नाहीत त्यांच्यासमोर वाचणे गरजेचे आहे. कितीही सोशल मीडिया आणि माध्यमे निघाली तरी पुस्तकांना पर्याय नाही. पुस्तके माणूस घडवितात आणि जगायला शिकवतात, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी सचिन हजारे म्हणाले, शंभर वर्षे कार्यरत असणाऱ्या शिवाजी वाचन मंदिरने वाचन चळवळ सुरू ठेवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. वाचन माणसाला मोठ्या पदावर नेऊन ठेवते. वाचनासाठी शासनाकडून देखील वाचन प्रेरणा दिन, संविधान दिन याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. प्रत्येक ग्रंथालयातील ग्रंथ संग्रहाची माहिती एका क्षणात उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून ई – ग्रंथालय देखील सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.
मान्यवरांचा परिचय व आभारप्रदर्शन डॉ. सुभाष दिघे यांनी केले. तर सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर, बाळासाहेब पंतवालावलकर, पद्मनाभ प्रभूझाट्ये, प्रा. चंद्रकांत गोखले, सौ. मेघना जोशी, सौ. राधिका कांबळी, भाऊ सामंत, सौ. अक्षता बांदेकर, हेमा परुळेकर, डॉ. अविनाश झाट्ये, डॉ. शिल्पा झाट्ये, सौ. मालती काळे आदी व इतर उपस्थित होते.
