पर्ससीन मासेमारी बंद न झाल्यास २६ जानेवारीला भर समुद्रात आंदोलन – बाबी जोगी

⚡मालवण ता.३१-: अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात हिवाळी अधिवेशनात आम. वैभव नाईक यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर मत्स्य मंत्र्यांनी अनधिकृत पर्ससीन व एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईसाठी शासन कडक पावले उचलून शासन पारंपारिक मच्छीमारांच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील अनधिकृत मासेमारी रोखण्याची जबाबदारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची असून पर्ससीन मासेमारी बंद न झाल्यास २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांविरोधात भर समुद्रात आंदोलन करू, असा इशारा श्रमिक मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष बाबी जोगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातमध्ये आमदार वैभव नाईक यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमाने पर्ससीन मासेमारी विरोधात आवाज उठविला. पारंपारिक मच्छीमाराना मासेमारी करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. राज्य शासनाने पारंपारिक मच्छीमारांच्या राखीव क्षेत्रात पर्ससीन एलईडी मासेमारी करण्यास बंदी घातलेली असताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात अनधिकृत बेकायदेशीर पर्ससेन, एलईडी मासेमारी केली जाते. सदर बंदी असलेल्या क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या बेकायदेशीर बोट धाराकावरती शासन कारवाईचे कडक धोरण अंमलात केव्हा आणणार ? असा प्रश्न आम. नाईक यांनी उपस्थित केला होता. या तारांकित प्रश्नावर राज्याचे मस्य मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी उत्तर देताना अनधिकृत मासेमारी करणाऱ्या पर्ससीन व एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी शासन पावले उचलणार तसेच जिल्हासाठी दोन गस्ती नौका आणि पारंपारिक मच्छीमारांच्या आड कोण येत असेल तर शासन पारंपारिक मच्छीमार यांच्या सोबत कायम असेल असा शब्द मत्स्यमंत्री यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनमध्ये दिला. मत्स्य मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे साऱ्या जिल्हातील व राज्यातील जनतेने पहिले आहे. आता १ जानेवारी पासून पर्ससेन, एलईडी शासनच्या आदेशाने बंद होत आहे. आता जिल्हामध्ये होणारी अनधिकृत मासेमारी रोखण्याची पूर्ण जबाबदारी मंत्रीमंडळातील मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची राहील. पारंपारिक व छोट्या मच्छीमार यांना राक्षसी पर्ससीन, एलईडी पासून त्यांची रोजी रोटी वाचवावी, हि जिल्ह्यातील मच्छीमारांची अपेक्षा आहे. १ जानेवारी नंतर हि राक्षसी मासेमारी बंद न झाल्यास २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यां विरोधात भर समुद्रात आंदोलन करणार, असे बाबी जोगी यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page