तालुक्यातील ५५ उपसरपंच पदासाठी होणार निवडणूक
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील ५५ उपसरपंचांची निवडणूक २९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सरपंच असणार आहेत. तर निवडणूक सचिव म्हणून त्या त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तालुक्यात आता नव्याने ५५ निरीक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. या सभेच्या कामकाजावर संबंधित निरीक्षक लक्ष ठेवणार आहेत.
निवडणुकीत ५४ ग्रामपंचायत सरपंचपद हे थेट निवडणुकीने निर्वाचित झालेले आहेत. मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिलेले आहे. उपसरपंचपदाची निवड प्रथम सभेत करावयाची असून मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीची प्रथम सभा ग्रामपंचायतीच्या मुदत संपण्याच्या तारखेची खात्री करून घेणे आवश्यक आहे. परंतु ग्रामपंचायत निवडणूक निकालाची अधिसूचना २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. मालवण तालुक्यात ग्रामसेवक पदे रिक्त असल्याने व निवडणूक असलेल्या ५४ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडे एका पेक्षा दोन ग्रामपंचायती असल्याने व महाराष्ट ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ प्रमाणे उपसरपंच निवडणुकीकरिता सभेसाठी ठरलेल्या वेळेपूर्वी किमान दोन तास अगोदर नामनिर्देशन पत्र दाखल करणे जरुरीचे असल्याने निवडणुकीदिवशी सचिव म्हणून खालील प्रमाणे नेमणूक करण्यात येत आहे.
सरपंचांना दोन मते
ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी सरपंच 4 हे सदस्य म्हणून इतर सदस्यांबरोबर मतदान करणार आहेत. तसेच ज्यावेळी समसमान मते दोन उमेदवारांना होतील त्याठिकाणी सरपंच आपल्या दुसऱ्या मताचा वापर करून उपसरपंच निवड करू शकणार आहेत. यामुळे उपसरपंच निवडीत सरपंचांना महत्वाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. ज्या ठिकाणी काठावरचे बहुमत सरपंच निवडून आलेल्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सरपंच आपले दुसरे मत नोंदवून उपसरपंचही आपल्या विचाराचा आणि आपल्याला पाठिंबा दिलेल्या पक्षाचा निवडून आणू शकणार आहेत.
