मालवण दि प्रतिनिधी
गतवर्षी प्रमाणे यावर्षीही भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिका प्रशानाने कार्यवाही करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मालवण पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडे केली आहे.
मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेता त्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम आमच्या कालावधीत २०१७ ला घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २०२१ मध्ये अशा प्रकारची मोहीम हाती घेऊन सुमारे ५०० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते. त्यामुळेच काही प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर उपाय योजना करता आली. परंतु पुढील काही वर्षे सातत्याने ही मोहीम सुरू ठेवली तर नक्कीच एक दिवस यावर कायमस्वरूपी उपाय योजना होऊ शकेल. अजून नगरपालिका निवडणुका झालेल्या नाहीत. नगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. तरी भटक्या कुत्रांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याबाबतचे लेखी निवेदन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना देण्यात आले आहे.
