रस्त्याच्या कामवरून आ नाईक आक्रमक

सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली धडक;जरीमरी, सागरी महामार्ग, बेळणे रस्त्याचा विषय

मालवण, दि प्रतिनिधी
कुंभारमाठ जरीमरी, सागरी महामार्ग आणि बेळणे या रस्त्यांच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यारंभ आदेश देऊनही या कामांना अद्याप सुरवात न केल्याने संतप्त बनलेल्या आमदार वैभव नाईक यांनी आज आपल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली यावेळी आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत येत्या आठ दिवसांत या कामांना सुरवात करा अशा सूचना देतानाच पुन्हा आठ दिवसांनी आपण पुन्हा कार्यालयाला भेट देऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मालवण शहरातील कुंभारमाठ जरीमरी या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर बेळणे तसेच शहरातील रेवतळे सागरी महामार्गाच्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणूनही तसेच या कामांना कार्यारंभ आदेश मिळाला असतानाही प्रत्यक्षात या कामांना सुरवात झालेली नाही. परिणामी यामुळे लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आक्रमक बनलेल्या आमदार वैभव नाईक यांनी आज दुपारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, मंदार केणी, किरण वाळके, मंदार ओरसकर, पंकज सादये, प्रसाद आडवणकर, सिद्धार्थ जाधव, दीपक देसाई, सन्मेष परब, मनोज मोंडकर, तपस्वी मयेकर, सिद्धेश मांजरेकर, राहुल परब, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधकामचे अधिकारी अजित पाटील, श्री. पाटील आदी उपस्थित होते.
कुंभारमाठ रस्त्याच्या कामाचे काय झाले असा प्रश्न आमदार नाईक यांनी श्री. पाटील यांना केला. यावर संबंधित ठेकेदाराला आवश्यक सूचना दिल्या आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल असे सांगितले. प्रत्यक्षात या कामांना जून महिन्यात कार्यारंभ आदेश मिळाला असताना अद्याप काम का सुरू झाले नाही. या रस्त्यावर खड्डे न बुजविता हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम करण्यात यावे अशा सक्त सूचना आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर बेळणे, सागरी महामार्गाच्या रस्त्याचेही काम तत्काळ हाती घेण्यात यावे. आम्हाला ठेकेदारावर आक्षेप घ्यायचा नाही. मात्र मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याने ते मार्गी लागायला हवे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे या महिना अखेर ही सर्व कामे मार्गी लागायला हवीत. पुन्हा आठ दिवसांनी आपण पुन्हा कार्यालयाला भेट देऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक तसेच पर्यटकांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही कामे तत्काळ मार्गी न लागल्यास अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल असा इशारा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी दिला.

फोटो – मालवण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थे बाबत आक्रमक बनलेल्या आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

You cannot copy content of this page