आर्थिक मदत करत दिला आधार
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील गुरामवाड़ी येथील रहिवासी, येथील वराडकर हायस्कूलचा बारावीतील विद्यार्थी सर्वेश शिवानंद परुळेकर (१८) याचे अपघाती निधन झाले होते. त्याच्या कुटुंबियांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेत आर्थिक मदत केली.
कागदोपत्री अडचणींमुळे त्याचे वडील, आई यांना शासकीय मदत मिळणे कठीण झाले आहे. जिल्हा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री चव्हाण यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी याची तातडीने दखल घेत रविवारी ‘परुळेकर कुटुंबियांची भेट घेतली. कोणतीही मदत लागली, तर मला संपर्क करा. मी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे आश्वासन पालकमंत्री चव्हाण यांनी दिले. सर्वेश हा आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा. सर्वेश कामानिमित्त नीलेश भातडये या मित्रासोबत मुंबई – गोवा महामार्गावरून दुचाकीने कुडाळच्या दिशेने जात होता. त्यावेळी मागून त्याच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला.
कागदोपत्री अडचणींमुळे कोणत्याही प्रकारची सरकारी मदत सर्वेशच्या कुटुंबाला मिळणे कठीण झाले आहे. त्याला धडक देणाऱ्या चारचाकी वाहन मालकानेही त्याला मदत देण्यास असमर्थता दर्शविली. याची दखल घेत पालकमंत्री चव्हाण यांनी परुळेकर कुटुंबाला तात्काळ काही आर्थिक मदत केली. भाजयुवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत, माजी सरपंच सतीश वाईरकर, उपसरपंच शैलेंद्र शंकरदास, मकरंद सावंत, सुमित सावंत, शेखर फोंडेकर, जगदीश चव्हाण, मंदार मठकर, राजू परुळेकर, विनय मठकर, तेजस म्हाडगूत आदी उपस्थित होते.
