आत्माराम नाटेकर; कथामाला मालवणचा कलागौरव पुरस्कार रामचंद्र कुबल यांना प्रदान.
मालवण दि प्रतिनिधी
“प्रत्येक चांगले काम करणाऱ्याचा नेहमीच गौरव होत असतो. रामचंद्र कुबल यांना दिलेल्या कलागौरव पुरस्काराने खऱ्या अर्थाने कलेचा गौरव झाला, असे प्रतिपादन मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य आत्माराम नाटेकर यांनी आचरा येथे काढले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, बॅ. नाथ पै जन्मशताब्दी वर्ष, कविवर्य वसंत बापट जन्मशताब्दी वर्ष अशा चतुरंग कार्यक्रमांचे औचित्य साधून वसंत बापट स्मृतिदिनी आयोजित कलागौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा श्रीमती सुशीला गोविंद जोशी स्मृती कलागौरव पुरस्कार सन २०२२ रामचंद्र एकनाथ कुबल, पदवीधर शिक्षक शाळा,आडवली नं.१ (मालवण) यांना केंद्रशाळा आचरे नं.१ च्या सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, मालवण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संजय माने, कथामला मालवणचे ज्येष्ठ सल्लागार सदानंद कांबळी, श्रुती गोगटे, केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, आचरे नं.१ मुख्याध्यापिका जोशी, कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, कथामाला कार्यकर्ते, आदी उपस्थित होते.
रामचंद्र एकनाथ कुबल हे गेली २४ वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत आहेत. प्राथमिक शाळा वाडे केरपोई, कोटकामते (देवगड) वायंगणी, कालावल, मठबुद्रुक, पाणलोस (तालुका मालवण ) या शाळेत सेवा करीत असताना त्यांनी मुलांना अभ्यासासोबतच चित्र, शिल्प, नाट्य, अभिनय यांचे प्रशिक्षण दिले. देवगड येथील कोटकामते शाळेत त्यांनी ४० बाल कलाकारांचे गीतरामायण हे नृत्य- नाट्य बसविले होते. त्याचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रयोग झाले. महाराष्ट्राची लोकधारा, मराठी संस्कृतीचे सण यावर त्यांनी बसविलेली नृत्य नाट्ये संस्मरणीय ठरली आहेत. एकांकिका लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण, काव्य लेखन, सूत्रसंचालन, नाट्य, नृत्य परीक्षण आदी क्षेत्रात रामचंद्र कुबल यांनी आपला एक वेगळा ठसा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात उमटविला आहे. मालवणी भाषेतील कथा- काव्य क्षेत्रातही त्यांची गेल्या २५ वर्षातील कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांनी अनेक मराठी, मालवणी शॉर्ट फिल्म साठी पटकथा लेखन केलेले आहे. त्यांनी पटकथा लिहिलेल्या झुल्बी, माली आणि टाइमप्लीज या तीन शॉर्ट फिल्मना गेल्या दोन वर्षात विविध राज्य आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कुबल यांनी "प्रत्येक गोष्ट आत्मानुभूती मिळविण्यासाठी करत असताना आपले उपक्रम घडत गेले आणि त्यातून आपल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनीही अवलंब केला यातच खरा आनंद आहे. यापुढेही कलेची अशीच सेवा माझ्या हातून घडो. कथामालेने संस्कार दिले आणि आज कलागौरव देऊन पुरस्कार देऊन माझा गौरव केला याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.
यावेळी को.म.सा.प. मालवण, यशराज गृप आचरे, शिक्षक पालक संघ,आचरे, गाबित समाज मालवण आदी विविध संस्था, शिक्षक, मित्रपरिवार यांनी रामचंद्र कुबल यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचलन परशुराम गुरव यांनी केले तर आभार प्छाया त्रिंबककर यांनी मानले.
