सौ. वर्षा ठाकूर यानी केलेल्या दुदुर्लीच्या भाजी प्रथम तर सौ. दिपा तेंडोलकर द्वितीय

कणकवली काॅलेज येथे रानभाज्या पाककला स्पर्धा उत्साहात

⚡कणकवली ता.१०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत कणकवली काॅलेज आय क्यू ए सी व सायन्स असोसिएशन आणि स्नेह सिंधु पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाज्या महोत्सव २०२३ मध्ये रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रानभाज्याबाबत शास्त्रीय माहिती जनसामान्या व विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचावी या उद्देशाने रानभाज्या प्रदर्शनामध्ये सिंधुदुर्गमध्ये सापडणा-या ६४ प्रकारच्या रानभाज्यांची सचित्र माहिती व प्रत्यक्षात रानभाज्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनातला विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, एस्. एम्. हायस्कूल, कणकवली, बालशिवाजी हायस्कूल व कणकवली काॅलेज, कणकवलीच्या असंख्य विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला.
रानभाज्या पाककला स्पर्धेमध्ये एकूण ५४ स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेत प्रदर्शित केलेल्या रानभाज्यामध्ये भारंगी, कुरडू, आराडा, एकपानी, मोठो करमळ, गुळवेल, घोळ, आंबुटी (आंबूशी), मोठो दिंडो, कपाळफोडी (कानफुटी, तेजोवंती), आंबाडा, नालगी, रानमुंग, कांचन (कोलेरा), टाकाळा, गारंबी(गारबी), लाजाळू(लाजरी), करटूली(फागला,रानकारले), पेंढरा, हस्तिपदा (गोजिभ), पाथरी, धान(आडाळा,आराडा), कुडा, जिवंती (शिदोदि), कोंदणी(सोनारवेल), खरशिंग, तालीमखाना(कोळशिंदा), भारंगी, आघाडा, गुनगुनी, राजगिरा, तांदुळजा(तांदळी), कुर्डू, दुदुर्ली, निवडुंग(निवलकानो), भुईआवळी, एकपानी(दुदुकी), कचर, पेव(पेवगा), रानकेळ(चवाय), केना, रानसुरण(शेवळा), अळू, काटेमाठ, नाऊळी, बाळ तेरडा, तांदळी इत्यादी रानभाज्याच्या वेगवेगळ्या पाककृती पारंपारिक पद्धतीने स्पर्धकानी सादर केल्या. या स्पर्धेचे परीक्षण सौ. मंगलताई परूळेकर, सौ. अपर्णा रेगे, सौ. अमृता पाडगावकर, सौ. माधुरी राणे व सौ. सुषमा केणी यांनी केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नारायणपेठ साडी व प्रशस्ती पत्रक सौ. वर्षा ठाकूर यानी केलेल्या दुदुर्लीच्या भाजीला प्राप्त झाले. व्दितिय क्रमांकाचे पारितोषिक गोडावन साडी व प्रशस्ती पत्रक सौ. दिपा तेंडोलकर यांनी केलेल्या निरूरीच्या भाजीला मिळाले. तर तिस-या क्रमांकाचे पारितोषिक इरकली साडी व प्रशस्ती पत्रक सेजल घाडीगांवकर यांनी केलेल्या एकपानी भाजीने पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे सौ. नेहा देसाई यांच्या कोळशिंदा भाजी, सौ. वैशाली पाटील यांच्या घोटवेल भाजीला तर अर्चना वारंग यांच्या रानमुग भाजीने पटकावला. या महोत्सवामध्ये स्नेह सिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांनी सर्व सहभागींना अळूचे सूप, कुर्डूची भाजी व तांदुळाची भाकरी असा पौष्टिक अल्पोपहार पानाचा द्रोण व चांदवडाच्या पानातुन दिला होता. सौ. वर्षा ठाकूर या महिला गावठी आठवडी बाजारात गावरान धान्य, कडधान्य, गावठी भाज्या व रानभाज्या विक्रिचा व्यवसाय करतात,
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतानाच आयोजकांनी आणखी एक सुवर्ण मध्य साधताना शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे सेक्रेटरी विजयकुमार वळंजू यांचेही हे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्यांचाही सन्मान कणकवली काॅलेजच्या वतीने संस्थेच्या चेअरमन डाॅ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते तर काॅलेज कर्मचा-यांच्या वतीने प्र. प्राचार्य डाॅ. राजेंद्रकुमार चौगुले व स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिनेअभिनेते अनिल गवस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील बहुसंख्य विद्यार्थी, एन्. सी. सी., एन्. एसू. एस्. चे स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page