माजी नगराध्यक्ष संजू परब : दीपक केसरकर यांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष
⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यात मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष केले असून, आमदार दीपक केसरकर यांनी देखील आपल्या मतदार संघाकडे दुर्लक्ष केला आहे. आमदार दीपक केसरकर यांनी गणेशचतुर्थी पूर्वी या सर्व कामांकडे लक्ष देऊन समस्या न सोडविल्यास तो तुमच्या आमदारकीचा तो कलंक असेल असा चिमटा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार केसरकर यांना आयोजित पत्रकार परिषदेत काढला आहे.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, जिल्हा बँक संचालक रवि मडगावकर,माजी नगरसेवक आनंद नेवगी,विनोद सावंत,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सर्व पक्षांकडून सावंतवाडी नगरपालिकेत मोती तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने गाळ काढण्यात आल्याने मोती तलावाचा एका बाजूचा कठडा कोसळला असून, अजूनही काही भाग कोसळण्याची शक्यता आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या कामासाठी अद्याप जॉब नंबर देण्यात आला नसून, 15 ऑगस्ट पूर्वी ते काम न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी अमानिका चव्हाण यांना घेराव घालू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
