नोकऱ्या मर्यादित झाल्याने विद्यार्थ्यांनी व्यवसायाचे ज्ञान आत्मसात करावे

काजू व्यावसायिक सुरेश नेरूरकर यांचे प्रतिपादन

⚡मालवण ता.०६-:
आज सर्वत्र स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर नोकऱ्या मिळतील परंतु त्या मर्यादित स्वरूपाच्या असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग उद्योग व्यवसायासाठी कसा करता येईल याचा विचार करून ज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन विरण येथील गणेश काजू इंडस्ट्रीचे मालक सुरेश नेरुरकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण- मुंबई संचलित मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज मधील दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा काजू कारखानदार सुरेश नेरुरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनरारी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक हणमंत तिवले, प्रा. पवन बांदेकर आदी व इतर उपस्थित होते.

प्रारंभी वामन खोत यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी सुरेश नेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायाविषयी मार्गदर्शन करताना उद्योग ही काही छोटी गोष्ट नाही किंवा अवघड गोष्ट नाही. उद्योगात मन लावून काम केल्यास यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञानही आत्मासात केले पाहिजे. कारण आज रोजगाराच्या संधी मर्यादित झाल्या आहेत. त्यामुळे उद्योगातूनच आपली प्रगती साधता येईल असे ते म्हणाले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी भंडारी हायस्कुलच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतानाच विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संस्था प्रामाणीक पणे प्रयत्न करीत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवित आहे, या उपक्रमातूनच एक सुसंस्कारी पिढी घडविण्याचे काम भंडारी हायस्कुल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. पाटकर यांच्या हस्ते काजू कारखानदार सुरेश नेरुरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप अवसरे यांनी केले.

You cannot copy content of this page