विद्यार्थ्यांना ताकद देण्यासाठी मी सदैव पाठीशी

मयूरपंख युवा महोत्सव समारोपाला आ नितेश राणे यांचा विश्वास

वैभववाडी प्रतिनिधी
शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी परिश्रम व मेहनत घेणे फार गरजेचे आहे. जे क्षेत्र निवडाल त्यात स्वतः ला झोकून द्या, स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना ताकद देण्यासाठी मी सदैव पाठीशी राहीन. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. सांगुळवाडी कृषी महाविद्यालय येथे मयूरपंख युवा महोत्सवाच्या सांगता समारंभ व बक्षीस वितरण प्रसंगी आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. या महोत्सवात कोकणातील 28 महाविद्यालये सहभागी झाली होती. मतदारसंघातील सांगुळवाडी येथील कृषी महाविद्यालयात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले.

तसेच विजेत्या, उपविजेत्या स्पर्धकांचेही त्यांनी अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यात वैभव संपन्न असा वैभववाडी तालुका आहे. या महोत्सवानिमित्त आपण या तालुक्यात आलात, आनंदी वातावरणात चांगले कार्यक्रम सादर केलात. याचा खूप आनंद झाला. पुढील वर्षी या कार्यक्रमात नक्की येईन असे त्यांनी सांगितले.
कृषी महाविद्यालयाचे संचालक संदीप पाटील यांचे आ. राणे यांनी भरभरून कौतुक केले. ते म्हणाले अनगरसिद्ध संचलित कृषी महाविद्यालय सांगुळवाडी संकुल उभ करण्यात संदीप पाटील यांचे फार मोठे योगदान आहे. तालुक्याच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यांना बळ देण्याचे काम लोकप्रतिनिधी या नात्याने मी नेहमीच करत राहणार आहे असे सांगितले. या सांगता समारंभ प्रसंगी कृषी विद्यापीठाचे सदस्य डॉ. व्ही.जी. नाईक, डॉ. शिरसाट, डॉ. पोटफोडे, डॉ. पवार, डॉ. थोरात, डॉ. पाटील, संचालक संदीप पाटील, कणकवली सभापती मनोज रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, बंड्या मांजरेकर व मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page