आरसीसीआय आणि कौस्तुभ रावराणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजन
वैभववाडी संजय शेळके
शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त आरसीसीआय आणि कौस्तुभ रावराणे मित्रमंडळांच्या सयुक्त विद्यमाने ६ ऑगस्टला निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार गटात घेतली जाणार असुन या स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
शहीद मेजर रावराणेच्या स्मृती दिनाचे औचीत्याने तालुक्यात विविध उपक्रम राबविले जात आहे. मेजर रावराणेंच्या जीवन प्रवास विद्यार्थ्याना ज्ञात व्हावा या हेतुने रावराणे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कौस्तुभ रावराणे मित्रमंडळ वैभववाडी यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा चार गटात होणार आहे. ५ ते ७ वी हा प्रथम गट असुन ८ वी ते १० वी असा दुसरा गट आहे. प्रथम गटाकरीता माझा भारत माझा अभिमान असा विषय असुन निबंधांकरीता शब्दमर्यादा ५०० इतकी आहे. तर दुसऱ्या गटाकरीता शब्दमर्यादा ७५० आहे. दोनही गटासाठी बक्षिसे अनुक्रमे प्रथम क्रमांकांस रूपये १ हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास-७५० रूपये
व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास-५०० व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ -२५० रूपये अशी आहेत. तृतीय गट ११ वी १२ वी विद्यार्थ्याचा असुन या गटाकरीता बलशाली भारत काळाची गरज असा विषय आहे. त्याकरीता शब्दमर्यादा १००० इतकी आहे. या गटाकरीता प्रथम क्रमांक-२००० हजार रूपये व सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांकास-१ हजार ५०० व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास १००० हजार रूपये व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ ५०० रूपये व सन्मानचिन्ह अशी पारीतोषीक आहेत.
चौथा गट हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी आहे. या गटासाठी हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे एक प्रेरणास्थान असा विषय असुन याकरीता १५०० इतकी शब्द मर्यादा आहे. या गटातील प्रथम क्रमांकास ३ हजार रूपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास २ हजार ५०० व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास १ हजार ५०० व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ ५०० रूपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषीके आहेत.
सर्व गटातील स्पर्धा या त्या त्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये ६ ऑगस्टला घेण्यात येतील. त्यानंतर स्पर्धकांचे निबंध ९ ऑगस्टला संयोजक संजय रावराणे यांच्याकडे एकत्र केले जाणार आहेत. त्यानंतर आयोजक समिती हे निबंध तपासणीसाठी तज्ञांकडे देणार आहेत. स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा १५ ऑगस्टला आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात सकाळी १० वाजता होणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सागर रावराणे आणि प्रकाश काळे यांनी केले आहे.
