विकास सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक पाठबळ देईल – मनीष दळवी

⚡मालवण ता.२९-: कोरोना महामारीच्या गेल्या दोन वर्षात विकास सहकारी संस्थांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. विकास संस्था सक्षम असल्या तरच सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. त्यामुळे विकास संस्थांना आर्थिक दृष्ट्य सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. विकास सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक पाठबळ देईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे बोलताना केले.

मालवण कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय सभागृहात शुक्रवारी जिल्हा बँकेतर्फे प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात व्यासपिठावर जिल्हा बॅकेचे संचालक व्हीक्टर डान्टस, मेघनाद धुरी, प्रकाश मोर्ये, आबा हडकर, राजू परूळेकर, सुरेश चौकेकर, जिल्हा बॅकेचे कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, क्षेत्रवसुली कर्ज विभाग प्रमुख के बी वरक, संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी विश्वनाथ, डोर्लेकर, विकास अधिकारी सुरज गवंडी, स्वप्नील केळुसकर, मालवण शाखा व्यवस्थापक रमकांत गोसावी, आदी उपस्थित होते.

यावेळी ३० जून अखेर पर्यंत वसुलपात्र बँक कर्जाची १०० टक्के वसुली केल्याबद्दल श्री रामेश्वर चिंदर विकास संस्था, त्रिंबक ग्रुप विकास संस्था, असरोंडी विकास संस्था अशा १०० टक्के कर्ज पूर्ण फेड केलेल्या ३ विकास संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचा सत्कार मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना मनिष दळवी पुढे म्हणाले, मालवण तालुक्यात २८ विकास संस्थांच्या माध्यमातून १८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले. तालुक्यातील कर्ज वसुली ७३ टक्के असून ३ संस्थांनी १०० टक्के वसुली केली. विकास संस्थांची कर्ज वसुली वाढावी, त्यांनी सक्षमतेने काम करावे, नफ्याने काम करावे तसेच अडीअडचणी दूर करण्यासाठी संस्थांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यात येणार आहे. खावटी कर्ज थकबाकी वसुली साठी पीक कर्जात वाढ देण्याची योजना जिल्हा बँक राबविणार आहेत. यात स्वतःचे नुकसान पत्करून जिल्हा बँक शेतकरी व संस्थांना मदत करण्यास पुढाकार घेत आहे. आज समाजात छोट्या छोट्या कर्जासाठी मोठ्या व्याजदर आकारून बेनामी सावकारी सुरू आहे. यात शेतकरी, छोटे व्यापारी, विक्रेते यांना मोठा फटका बसत आहे. यातून आत्महत्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा बँकेकडून २५ हजार रुपयांपर्यंतची कर्ज योजना राबविणार आहे. तसेच विकास संस्थांच्या ठिकाणी मायक्रो एटीएम योजना राबवून त्या माध्यमातून बँकिंग व्यवहार करण्यात येणार आहेत. विकास संस्थांनी कारभार स्वच्छ व पारदर्शक ठेवून तसेच पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सहकार व शेतकरी सक्षम होण्यासाठी काम करावे असेही दळवी म्हणाले.

यावेळी व्हिक्टर डान्टस म्हणाले, शेतकऱ्यांच्या विकासात विकास संस्थांचे महत्व मोठे आहे, त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होतो, सध्या स्पर्धेचा काळ असल्याने विकास संस्थांनी अधिक काम करणे गरजेचे आहे, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांना न्याय देण्यासाठी काम करावे, असेही डान्टस म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी करत आभार मानले.

You cannot copy content of this page