Headlines

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेत छत्री वाटप…

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडीच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव शाळेच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, या सामाजिक भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात मिळत असून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान गेली दहा वर्षे सातत्याने शालेय वस्तू, छत्री वाटप तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संस्था करत असून सावंतवाडी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये संस्थेचे खजिनदार भगवान रेडकर यांच्या माध्यमातून छत्री वाटपाचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. मळगाव इंग्लिश स्कूल मध्ये काल बुधवारी छत्री वाटप करण्यात आले. यावेळी निवृत्त राजपत्रित अधिकारी शेखर पाडगावकर, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे खजिनदार भगवान रेडकर, मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे खजिनदार नंदकिशोर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले, सामाजिक कार्यकर्त्या रंजना तेली, सिद्धेश तेंडोलकर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी शाळेच्यावतीने सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page