Headlines

अनुदान वाढीबद्दल दशावतारी कलाकार कृतज्ञ…

शासन निर्णय तयार करताना कलाकारांना विचारात घेण्याची मागणी:पारंपरिक दशावतार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्गची पत्रकार परिषद..

⚡कुडाळ ता.०९-: आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन दशावतारी कलाकारांना शासनाने मानधन वाढवून दिले आहे. त्यासाठी आमदार निलेश राणे यांच्यासह सर्वांचेच दशावतारी कलाकारांनी आभार मानले. पण याबाबतचा शासन निर्णय तयार करताना पारंपरिक दशावतार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दशावतारी कलाकारांना विचारात घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. पारंपरिक दशावतार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग या दशावतारी कलाकारांच्या संघटनेमार्फत आज आमदार निलेश राणे यांच्यासह सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानण्यात आले. कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व दशावतारी कलाकारांनी शासनाच्या या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दशावतार कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम दोन कोटी २२ लाख रुपयांवरून चार कोटी ४० लाख रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी घोषणा संस्कृती कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत केली. त्यासाठी पाठपुरावा करणारे आमदार निलेश राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह शासनाचे दशावतार कलाकारांनी पत्रकार परिषद घेऊन आभार व्यक्त केले. कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेला पुरुषोत्तम कोचरेकर, संतोष रेडकर, चारू मांजरेकर, पप्पू नांदोसकर, विलास तेंडोलकर, सुरेश गुरव, प्रसाद शिरोडकर, सुरेश गुरव, यश जळवी, गुरु मेस्त्री, पुरुषोत्तम खेडेकर, दत्तप्रसाद शेणई, उदय मोर्ये, नारायण आशयेकर, महेश गवंडे, निळकंठ सावंत, सुधीर परब आदी दशावतारी कलाकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार बहूउद्देशीय संघ चे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर म्हणाले, आमचा हा सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार बहूउद्देशीय संघ सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापना १६ जून २०२० साली झाली. कलाकार आणि कलाकाराचे हित साधावे, कलाकाराला शासकीय पाठबळ मिळावे, हाच यामागे उद्देश होता. गेल्या वर्षी मुंबईत आमदार निलेश राणे यांनी सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्याशी भेट करून दिली होती. त्यावेळी सांस्कृतिक मंत्र्यांना आम्ही आमच्या मागण्या सांगितल्या. त्यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते. पण यावेळच्या पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी आमच्या मागण्यांचा पाठपुरावा केला. मूड मांडला. त्याला अनुसरून सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी उत्स्फूर्तपणे आमच्या मागण्या मान्य केला. तो क्षण आमच्या आयुष्यात सोनियाच्या दिवसासारखा आहे. त्यामुळे आम्ही सर्व दशावतारी कलाकार मुख्यमंत्री देवेंद्रर फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार प्रमोद जठार, या सर्व विषयाला वाचा फोडली ते आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जि प उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना कार्यकर्ते देवेन सामंत यांचे आभार मानत असल्याचे श्री. कोचरेकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार बहूउद्देशीय संघाचे सल्लागार संतोष रेडकर म्हणाले, आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे आमची मोठी मागणी मान्य झाली आहे. पण एक मुद्दा सांगावासा वाटतो तो म्हणजे, कलाकाराला काम करताना त्याचा कपडेपट, रंगभूषा साहित्य साहित्य यासाठी मोठा खर्च होतो. कलाकाराची ती मालमत्ता त्याची स्वतःची असते. ती त्याला कोणी देत नाही. त्यासाठी त्याला स्वतःला खर्च करावा लागतो. मालक चालक कलाकाराला जे साहित्य देतात तो म्हणजे पेटारा असतो. त्यात आयुधे आणि गणपतीचे मुखवटे असतात. बाकी सर्व साहित्य कलाकार वापरतात ते त्या कलाकारांचे असते, त्या दृष्टीने विचार व्हावा अशी मागणी संतोष रेडकर यांनी केली.
या संघाचे सल्लागार दत्तप्रसाद शेणई यांनी सांगितले की मुळात पॅकेज हे कलावंतांसाठी तयार केले जाते. पण त्याचा लाभ हा कलावंतांना होत नाही. कारण शासन हे पॅकेज कंपनीच्या मालकांना देतात. पण मुळात कलावंतांना बुटा पासून ते मुकुटापर्यंत जो खर्च येतो तो कलावंतांना स्वतः करावा लागतो. तसेच रंगांचा खर्च सुद्धा कलावंत करतात. म्हणून या पॅकेज मध्ये कलावंतांचा विचार केला जावा. याचा शासननिर्णय करतेवेळी दशावतारी कलाकारांना विचारात घ्यावे आणि मिळणारे पॅकेज हे कलावंतांपर्यंत यावे यासाठी समितीने आणि शासनाने प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ दशावतारी कलाकार रवींद्र खानोलकर यांनी सुद्धा आमदार निलेश राणे आणि शासनाचे आभार मानले.

You cannot copy content of this page