नुकसानभरपाई व पीक विम्याची तातडीने मिळवून द्या; अन्यथा प्रश्न न सुटल्यास १५ ऑगस्टपासून उपोषण करावे लागेल शेतकऱ्यांची संजू परबांकडे मागणी..
⚡सावंतवाडी, ता. ९-: सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानभरपाई व पीक विम्याचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी फणसवडे येथील शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते संजू परब यांच्याकडे केली. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास १५ ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेत संजू परब यांनी लवकरच तहसीलदारांची भेट घेऊन हा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले. तसेच, आवश्यक असल्यास स्थानिक आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीक विम्याचा लाभ तात्काळ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तातडीने गावात भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांनी संजू परब यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
यावेळी चंद्रकांत गावडे, रामकृष्ण गावडे, प्रभाकर गावडे, विठ्ठल गावडे, शेखर गावडे, आनंद गावडे, प्रकाश गावडे, विलास गावडे, सचिन गावडे यांच्यासह फणसवडे गावातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
