दत्ता सामंत: महायुतीच्या सर्व नेत्यांचे मानले आभार..
⚡मालवण ता.०९-:
सध्या मुंबईत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, मच्छीमार आणि स्थानिक कलाकारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न अत्यंत अभ्यासूपूर्वक मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे. आमदार निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या भावनांना सभागृहात वाचा फोडली असून, महायुती सरकारनेही या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले आहेत, अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या विविध ७ ते ८ प्रमुख मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली आणि महायुती सरकारचे आभार मानले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आमदार निलेश राणे यांनी हा प्रश्न सभागृहात लावून धरल्यानंतर, कृषिमंत्र्यांनी अवघ्या १२ तासांत निर्णय घेत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर साडेबावीस हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली. याशिवाय इन्शुरन्सचे पैसे वेगळे मिळणार असून, पुरवणी यादीमध्ये शेतकऱ्यांसाठी आणखी एक विशेष पॅकेज जाहीर करण्याचे कृषिमंत्र्यांनी मान्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट मदत मिळवून देण्यात आमदारांना यश आले आहे.
पारंपरिक व व्यावसायिक मच्छीमारांच्या डिझेल कोट्याचा प्रश्न आमदारांनी सभागृहात मांडला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात असणारा कमी डिझेल कोटा, डिझेलचे वाढीव दर आणि परतावा यातील तफावत त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे दोन्ही बंधू मच्छीमारांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनीही यावर सकारात्मक पावले उचलली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात जुने वीज मीटर काढून ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा जो उपक्रम राबवला जात होता, तो सर्वसामान्यांसाठी कसा जाचक आहे, हे आमदार राणे यांनी सभागृहात स्पष्ट केले. जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्यामुळे या स्मार्ट मीटरच्या सक्तीला सध्या स्थगिती मिळाली आहे.
जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदे, डॉक्टरांची कमतरता आणि औषध तुटवडा याकडे त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. नव्याने सुरू होणारे मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय या दोन्ही व्यवस्थांचा ताळमेळ बसवून सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
मतदारसंघातील वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच चौके, कट्टा आणि सुकळवाड येथील प्रवासी शेडच्या कामांसाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेतला आहे.
यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, काही विरोधी नेते केवळ पत्रकारांसमोर बसून महायुती सरकार आणि राणे कुटुंबावर विनाकारण टीका करतात. स्वतः आमदार असताना त्यांनी हाऊसमध्ये जनतेच्या प्रश्नांवर किती वेळ भाषण केले, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आमदार- खासदार हे गावात बोलण्यासाठी नसून विधिमंडळात आणि संसदेत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी असतात, याचे भान त्यांनी ठेवावे, असा टोला सामंत यांनी विरोधकांना लगावला.
सामंत म्हणाले की, आम्ही जरी शिवसेनेचे काम करत असलो, तरी जेव्हा सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि मच्छीमार निलेश राणे यांच्या कामाचे कौतुक करतात, तेव्हा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आम्ही योग्य लोकप्रतिनिधी निवडल्याची भावना मतदारांमध्ये आहे. सिंधुदुर्गाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे सर्वजण भगीरथ प्रयत्न करत आहेत. या सर्वच मंत्रिमंडळाचे आम्ही जाहीर आभार मानतो आणि आमदार निलेश राणे यांना पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना करतो असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.
