Headlines

मळगाव येथील मिलिंद पंतवालावलकर यांचा कृषी विभागाकडून विशेष सन्मान…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रगतशील शेतकरी म्हणून गौरव…

⚡सावंतवाडी ता.०९-: भारतीय किसान संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा कोषाध्यक्ष तथा मळगाव येथील प्रगतशील शेतकरी रामकृष्ण उर्फ मिलिंद पंतवालावलकर यांचा कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय कृषी दिन कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
जिल्हास्तरीय कृषी दिन कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील आंबडपाल येथे पार पडला, तर सावंतवाडी तालुकास्तरीय कृषी दिन कार्यक्रम बांदा येथे आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमांत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
रामकृष्ण उर्फ मिलिंद पंत वालावलकर यांनी अनेक वर्षांपासून अभ्यासपूर्ण आणि आधुनिक शेतीचा ध्यास घेतला आहे. श्री पद्धतीने भात लागवड, पंचक्रोशीत अत्याधुनिक भात मळणी यंत्र उपलब्ध करून शेतकऱ्यांचे श्रम कमी करणे, गावठी बियाण्यांचे संवर्धन, बेबी कॉर्नची लागवड तसेच देशी गाईंचे संगोपन यांसारखे विविध उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना संघटित करून ‘कल्पवृक्ष शेतकरी गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून दुग्धोत्पादनाला चालना देत अत्याधुनिक दूध संकलन व्यवस्था उभारली असून गोकुळ दूध संघाच्या चार तालुक्यांतील दूध संकलन केंद्राचे यशस्वी संचालन करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. भात पीक विमा, वन्यप्राण्यांचा उपद्रव, रोजगार हमी योजनेतील त्रुटी यांसारख्या शेतकरीहिताच्या प्रश्नांवर भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे संघटन करून विविध आंदोलने उभारण्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच माणगाव येथील डॉक्टर हेडगेवार प्रकल्पाचे विश्वस्त म्हणून शेतकऱ्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन, गावाचे गावपण जपणे आणि एकत्र कुटुंबाची यशस्वी जबाबदारी सांभाळत सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणे, ही त्यांची विशेष ओळख आहे.
कृषी क्षेत्रातील त्यांच्या बहुआयामी योगदानाची दखल घेत कृषी विभागाने केलेला हा सन्मान संपूर्ण भारतीय किसान संघासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच भारतीय किसान संघ, सिंधुदुर्गच्यावतीने मिलिंद पंतवालावलकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page