⚡बांदा ता.१४-: बांदा शहरात माकडांचा उच्छाद सुरुच आहे. कट्टा कार्नर येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सलूनमध्ये माकडाने आरसा व इतर सामानाची नासधूस केली. यात सुमारे ७ हजारांचे नुकसान झाल्याचे सलून मालक नाना कदम यांनी सांगितले. सायंकाळी उशिरा बांदा वनपाल अनिल मेस्री यांना स्थानिक व्यापार्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. माकडाचा लवकरच बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन मेस्त्री यांनी दिले.
माकडांचा सातत्यपूर्ण उपद्रव ही या भागातील नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. वनविभागाने नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी गेली दोन वर्षे सांगूनही वनविभागा मात्र झोपा काढत आहे. वनविभाग माणसांवर हल्ला केल्यास पुर्णत: वनविभाग जबाबदार राहील असा इशारा स्थानिकांनी दिला.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माकडाने कदम यांच्या सलून दुकानात घुसून आरसा व इतर वस्तूची नासधूस केली. स्थानिकांनी माकडाला हुसकावून देण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक दुकानदार संतोष चिंदरकर, गाैरांग शेर्लेकर, सुशील देसाई, अरविंद मांजरेकर, अरुण पराजंपे, आपा चिंदरकर, उमेश कुंबल, दिनकर सावंत, दिगंबर चव्हाण, नार्वेकर यांनी आरडाओरड करत माकडाला पळवून लावले.
बांदा शहरात माकडांचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरु आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने माकडांचा वेळीच बदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वनविभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत. तसेच उपद्रवी माकडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी बांदा दशक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.
बांद्यात माकडांचा हाैदोस सुरु असल्याने कट्टा कार्नर येथील व्यापारी व स्थानिकांत भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात माकडाने सुजाता फोटो स्टुडओत प्रवेश करत दोन वेळा मिळून ७३ हजारांचे नुकसान केले आहे. बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी प्रत्यक्ष ४० हजार रुपये नुकसानीचा पंचनामा केला. पण महिना उलटला तरीही एक रुपयाही भरपाई न मिळाल्याचे फोटो स्टुडिओचे मालक अजित दळवी यांनी सांगितले.
स्थानिक या माकडांना पळवून लावण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहेत. अॅटमबाँब, फटाके यांचा वापर करत पळवून लावत आहेत. पण यांचा माकडांवर कोणताही परिणाम दिसून येत आहे. वनविभागाच्या निद्रीस्त भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
