नगरसेवक मंदार शिरसाट यांनी घेतली प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांची भेट

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्थानिक पातळीवर मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने युवासेना जिल्हाप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी पुढाकार घेतला आहे. कुडाळ येथे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून सुसज्ज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात मंदार शिरसाट यांनी मुंबई येथे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत आणि मेहनती आहेत. दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये जिल्ह्याचा निकाल उल्लेखनीय असतो. मात्र, ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन, आधुनिक ग्रंथालय आणि अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांत जाऊन महागडे क्लासेस लावणे शक्य होत नाही, ही बाब निवेदनात मांडण्यात आली आहे.
यापूर्वीही मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची दोन विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. कुडाळ हे जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि प्रमुख शैक्षणिक केंद्र असल्याने येथे कायमस्वरूपी मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्यास जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. तसेच प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर पोहोचण्याची संधी ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संदीप म्हाडेश्वर, साई शिंदे आणि सागर तळेकर उपस्थित होते.
