Headlines

देवगडच्या अग्निशमन यंत्रणेचा कारभार अपुऱ्या मनुष्यबळावर…

एकाच वाहनावर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी:२४ तास सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा, सुधीर तांबे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी..

⚡देवगड ता.२०-: देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपंचायतीकडे एक अग्निशमन वाहन उपलब्ध असले तरी ते चालविण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत आग विझविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित अधिकारी, वाहनचालक आणि अग्निशमन जवानांची संख्या अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या अग्निशमन विभागात केवळ एक ते पाच कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती असून, अशा परिस्थितीत २४ तास अग्निशमन सेवा तत्पर ठेवणे शक्य आहे का, असा सवाल स्वीकृत नगरसेवक सुधीर लवू तांबे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत चौकशी करून आवश्यक प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि अग्निशमन सेवा २४ तास कार्यान्वित ठेवावी, अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आगीची घटना कोणत्याही वेळी घडू शकते. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत गरजेनुसार कर्मचाऱ्यांना बोलावले जात असल्यास प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे अग्निशमन वाहन आणि यंत्रणा चोवीस तास सज्ज असणे आवश्यक असल्याचे तांबे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या ३१ ऑगस्ट २००९ रोजीच्या महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान शासन निर्णयातील परिशिष्ट ड (भाग दोन) मध्ये एका अग्निशमन वाहनासाठी आवश्यक आदर्श मनुष्यबळाचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. तसेच शासन निर्णयातील परिच्छेद ७१ ते ७६ नुसार अग्निशमन केंद्रात किमान कर्मचारी २४ तास तैनात ठेवणे आणि प्रत्येक पाळीसाठी आठ तासांचा कर्तव्यकाळ निश्चित करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या ६ मे २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसारही नगरपंचायतींनी आवश्यक पदनिर्मिती करून प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागातील सध्याची पदनिहाय कर्मचारी संख्या, त्यांची शैक्षणिक पात्रता, अग्निशमन प्रशिक्षण आणि नियुक्तीचा प्रकार यांची माहिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अग्निशमन केंद्राचा मंजूर प्रकार, मंजूर कर्मचारी आकृतिबंध आणि प्रत्यक्ष कार्यरत मनुष्यबळ यांची तुलना करून अहवाल तयार करावा. अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशामक, चालक-यंत्रचालक आणि अग्निशामक जवानांची आवश्यकतेनुसार पदनिर्मिती करून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. कायमस्वरूपी नियुक्त्या होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करून तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी उपलब्ध ठेवण्यासाठी अधिकृत ड्युटी रोस्टर तयार करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
अग्निशमन वाहनासाठी आवश्यक परवाना व प्रशिक्षण असलेले चालक उपलब्ध करून देण्याबरोबरच वाहनाची तांत्रिक स्थिती, पंप, होज पाइप, पाण्याची टाकी आणि अन्य उपकरणांची कार्यक्षमता तपासण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय अग्निशमन सेवा शुल्क व आग सुरक्षा निधीची तरतूद, मागील तीन वर्षांत शासनाकडून मिळालेले अनुदान, नगरपंचायतीचा निधी, झालेला खर्च आणि कर्मचारी वेतन यांचा तपशील उपलब्ध करून द्यावा, असेही तांबे यांनी म्हटले आहे.
सदर अग्निशमन केंद्राची महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून त्रुटींचा अहवाल तयार करावा आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल तसेच कर्मचारी नियुक्तीचे कालबद्ध वेळापत्रक द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
देवगड-जामसंडे शहरातील नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अग्निशमन विभाग सक्षम असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय आणि नगरविकास विभागाकडे प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाहीसाठी तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page