⚡मालवण ता.१४-: मालवण येथील नगर वाचन मंदिर आणि कै. राधाबाई हरश्चिंद्र नारिंग्रेकर पुस्तक पेढी अंतर्गत मालवण शहर आणि परीसरातील प्रशालेमधील एकूण ५६ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले.
नगर वाचन मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह प्रा. नागेश कदम, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी शिक्षक व संस्थेचे हितचिंतक विनायक कोळंबकर, ग्रंथपाल संजय शिंदे उपस्थित होते. सुरवातीला ग्रंथपाल संजय शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यवाह नागेश कदम यांनी संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली.
यावेळी विनायक कोळंबकर यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबरोबरच सांस्कृतिक कार्यातील आजवरच्या उपक्रमांबाबत माहिती करून दिली. मालवण मधील अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल, लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळा, डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूल, रेवतळे प्राथमिक शाळा, ओझर विद्यामंदिर कांदळगाव, लक्ष्मीबाई टोपीवाला सराव पाठशाळा, भंडारी हायस्कूल, भंडारी प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय बिळवस इत्यादी शाळांतील गरीब व होतकरू विद्यार्थी व विद्यार्थीनींना यावेळी गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षकांच्या वतीने ओझर विद्यामंदिरचे शिक्षक दिपक जाधव यांनी संस्थेच्यावतीने गेली २० वर्षे राबवित असलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार मानून या उपक्रमामुळे शाळांवरील भार कमी झाल्याची जाणीव आपल्याला आहे, अशी भावना व्यक्त केली. आभार प्रदर्शन ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला लाभार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
