जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावी

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन;बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपने केला सन्मान

मालवण (प्रतिनिधी)

आपण कसे जगावे हे आपल्याला शिक्षण शिकवते. आजची मुले स्पर्धेच्या आणि अधुनिकेतच्या युगात शिक्षण घेत आहेत. आयएएस ऑफिसर, उद्योग व्यवसाय क्षेत्र यात मराठी, कोकणी, मालवणी मुले कमी दिसतात. मात्र येथील मुलांनी मोठी स्वप्ने पहावीत. स्वतःला कमी लेखू नये. जगात अशक्य असे काही नाही, त्यामुळे कोकणी मुलुखातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन प्रगती साधावी, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येथे बोलताना केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजप प्रदेश सचिव यांच्यावतीने मालवण मधील बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा राणे यांच्या मालवण चिवला बीच येथील निलरत्न बंगल्यावर संपन्न झाला. यावेळी ना. नारायण राणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब देऊन गौरविण्यात आले. यावेळी निलेश राणे, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आबा हडकर, संतोष साटविलकर, भाजप महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. पूजा वेरलकर, सौ. पूजा सरकारे, सौ. नमिता गावकर, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी ना. नारायण राणे म्हणाले, आज मी देशाचे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खाते सांभाळत आहे. देशातील ८० टक्के उद्योग या खात्या अंतर्गत येतात. मात्र मला उद्योग व्यवसायांत मराठी, कोकणी, मालवणी माणसे दिसत नाहीत. अधिकारी वर्गातही कोकणी माणूस दिसत नाही. येथील मुले शिक्षण घेऊन छोट्या मोठ्या नोकऱ्या करत आहेत. मात्र जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. आणि तो मिळवायचा असेल तर उद्योग क्षेत्रांत उतरले पाहिजे. मुलांनी कोणत्या क्षेत्रात जायचे हा विचार आधीपासूनच केला पाहिजे. का शिकायचे आणि कोण बनायचे याचे चिंतन केले पाहिजे. मोठी स्वप्ने पहावीत, मोठ्या नोकऱ्या करा, मोठे उद्योग उभारा. मराठी कोकणी मुलांमध्ये कोणतीही कमी नाही. स्वतःला कमी लेखू नये. आपणही जिद्द ठेवून वाटचाल केली, आणि जे हवे ते मिळवत गेलो. येथील मुलांनीही जिद्द बाळगून प्रगती साधून रुबाबात जगले जगले पाहिजे. मुलांनी अधुनिकतेची कास धरत व्यवसायाकडे वळले पाहिजे असेही ना. राणे म्हणाले.

निलेश राणे म्हणाले, आमच्या कुटुंबात राणे हेच आमची युनिव्हर्सिटी होती. त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही पुढे चाललो. आपल्या मातीशी आपण कायम जोडले राहिलो पाहिजे. शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील संधी निर्माण झाल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी संधींचा लाभ घेत प्रगती साधावी असेही निलेश राणे म्हणाले. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page