रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर यांचे प्रतिपादन…
⚡मालवण ता.१५-: शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या भंडारी ए. सो. हायस्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असून शैक्षणिक साहित्याचे वाटप असो अथवा व्हर्च्युअल लॅब, आय. टी लॅब यासारखी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यास देणारे उपक्रम असो आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे या हेतूने भंडारी हायस्कूल काम करत आहे. विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या या अनेकविध उपक्रमांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रशालेच्या ग्रंथालय विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सांगोडकर हे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. रवींद्र वराडकर, संस्थेचे खजिनदार जॉन नऱ्होना, प्रशाळेचे मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, रोटरी क्लबचे चाचा हडकर, बाळू तारी, अभय कदम, अजय जोशी, पंकज पेडणेकर, सुहास ओरसकर, संजय गावडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आर डी बनसोडे, अनिता चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक श्री. वामन खोत यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. यावेळी श्री. रवींद्र वराडकर यांनी भंडारी हायस्कूलच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करतानाच या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भंडारी हायस्कूलच्या उज्वल शैक्षणिक परंपरेचा वारसा जोपासून प्रशाळेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच, पेन आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शेवटी प्रफुल्ल देसाई यांनी आभार मानले.
