आशिष सुभेदार; कर्तव्यात कसूर करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा
सावंतवाडी ता.२५-:* आंबोली घाटात काल रात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातास पोलिस यंत्रणा जबाबदार असून, पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचाराने त्या युवकाचा नाहक बळी घेतला असून, पोलिस प्रशासनाने त्याची जबाबदारी स्वीकारत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तात्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे पोलिस विभागाच्या निषेधार्थ आंदोलनाचा पवित्रा घेईल असा इशारा मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून दाणोली येथील चेकपोस्ट वरील कर्मचारी अवजड वाहन धारकांकडून 2 ते 3 हजार घेऊन रात्री 12 नंतर घाटमार्गातून जाण्याची मुभा देतात अशा तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांचे या संदर्भात लक्ष वेधण्यात आले होते.
तरीही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची मुजोरी चालूच राहिल्याने वेताळ बांबर्डे येथील युवकाचा नाहक बळी गेला आहे. अवजड वाहतुकीसाठी घाटबंदी असताना मालाने भरलेला ट्रक पोलीस चौकी ओलांडून घाटमार्गे गेलाच कसा हा खरा प्रश्न असून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर शासन आदेशांची पायमल्ली करून कर्तव्यास कसूर केलेप्रकरणी तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
