Headlines

कृषी व सामाजिक कार्यासाठी विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’

⚡बांदा ता.०८-: सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे संस्थापक-अध्यक्ष तथा डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. कृषी, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन, भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क व बीबीएल मराठी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी येथे शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत विलास सावंत यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला आमदार भीमराव तापकीर-अण्णा, नंदकुमार ऊर्फ बाबुजी वाळंज, भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई, दिलीप बनाडे, डॉ. पियू धनवडे-कोल्हापूरकर, राणी बबिता मुसळे, ह.भ.प. कृष्णा फाटे महाराज, ॲड. दिलीप जगताप, डॉ. सुचिता पाटील, अभिजित संकपाळ पाटील, साक्षी कालवेडेकर, संपादक डॉ. राजीव लोहार व मनीषा लोहार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
विलास सावंत यांनी गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. काजू, आंबा, नारळ, सुपारी आदी पिकांच्या विकासासाठी त्यांनी विविध स्तरांवर पाठपुरावा केला. सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाची स्थापना करून शेतकऱ्यांना संघटित करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
डिंगणे गावात युवक व महिला मंडळांची स्थापना, महिला बचतगट उभारणी, ग्रामविकास, वीज, पाणी, पोस्ट सुविधा तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, अनुदान व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केलेल्या त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.
या सन्मानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व विविध स्तरांतील मान्यवरांनी विलास सावंत यांचे अभिनंदन केले आहे.
चौकट:-
सिंधुदुर्गला कृषी पर्यटन आणि काजू उद्योगाची मोठी संधी : विलास सावंत
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना विलास सावंत म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कष्टकरी शेतकरी, फळबागायतदार आणि ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे. जिल्ह्यातील काजू, आंबा, नारळ आणि सुपारी ही आपली खरी संपत्ती आहे. विशेषतः सिंधुदुर्गचा काजू हा दर्जेदार असून त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि कृषी पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध आहे.”
ते पुढे म्हणाले, “सिंधुदुर्गमध्ये नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे, डोंगररांगा आणि फळबागांचे अद्वितीय मिश्रण आहे. काजू बागांना पर्यटनाशी जोडून ‘कॅश्यू व्हिलेज’ ही संकल्पना विकसित केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. काजू प्रक्रिया, काजू उत्पादने, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैली यांचा अनुभव देणारे कृषी पर्यटन प्रकल्प उभारल्यास जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल.”
“यासाठी शासनाने कृषी पर्यटनाला विशेष प्रोत्साहन, पायाभूत सुविधा, विपणन व्यवस्था आणि प्रक्रिया उद्योगांना आर्थिक सहाय्य द्यावे. सिंधुदुर्गचा काजू देश-विदेशात अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शेतकरी, सहकारी संस्था, उद्योजक आणि शासन यांनी संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे. हा पुरस्कार मला भविष्यात अधिक जोमाने शेतकरी आणि समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे,” असेही त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page