Headlines

मालवणी खाद्य संस्कृतीचा महिला बचत गटांनी ब्रँड तयार करावा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन

कणकवली: मालवणी खाद्य संस्कृतीतील पारंपरिक पदार्थांना व्यावसायिक स्वरूप देऊन महिला बचत गटांनी स्वतःचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र, कणकवली यांच्या १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या हिरकणी लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, पंचायत समिती सभापती हर्षवर्धन वाळके, पंचायत समिती सदस्य बाबलू सावंत तसेच तालुक्यातील महिला उद्योजिका आणि बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक श्रीमती मिरशी गेंडे यांनी उद्योग विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अर्जुन सर यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या बँकिंग व कर्ज योजनांची माहिती दिली. तसेच तालुका कृषी अधिकारी विनायक पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी हिरकणी लोकसंचालित साधन केंद्रामार्फत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुरुष सुधारक सन्मान पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्षेत्रांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.

सभेत बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गटांचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी तयार केलेल्या मालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मालवणी खाद्य संस्कृतीतील पारंपरिक पदार्थांना आधुनिक विपणनाची जोड देऊन त्यांचा स्वतंत्र ब्रँड विकसित केल्यास महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी अमरीश मिरझे यांनी मागील वर्षातील केंद्राच्या कामकाजाचा आढावा सादर केला. शासनाकडून महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना, अनुदाने आणि उद्योजकीय विकासासाठीच्या संधी यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात सिंधू कृषी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मान्यवरांनी दिले.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘पुरुष सुधारक सन्मान’ उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. महिलांच्या सक्षमीकरणात पुरुषांच्या सकारात्मक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा अभिनव उपक्रम असल्याचे मत सभापती हर्षवर्धन वाळके यांनी व्यक्त केले. महिलांच्या समस्या, अडचणी आणि सामाजिक आव्हानांविषयी पुरुषांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधन केंद्राच्या व्यवस्थापक सीमा गावडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखापाल आराध्या परब, विकास सल्लागार अथर्व मेस्त्री तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page