१३ ऑगस्टला मुंबईत प्रयोग; सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्राला मिळणार नवी झळाळी..
सावंतवाडी : मुंबईतील वरळी येथील प्रतिष्ठित नेहरू सेंटरच्या संगीत नाट्यमहोत्सव २०२६ मध्ये सावंतवाडीच्या श्री परमेश्वर प्रॉडक्शन निर्मित ‘संगीत मत्स्यगंधा’ या संगीत नाटकाचा प्रयोग गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. कै. प्रा. वसंत कानेटकर लिखित या नाटकाच्या माध्यमातून सावंतवाडीतील स्थानिक कलाकारांना मुंबईच्या प्रतिष्ठित रंगभूमीवर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.
‘संगीत मत्स्यगंधा’चे दिग्दर्शन तसेच कार्यकारी निर्मिती बाळ पुराणिक यांनी केली आहे. नाटकाचे मूळ संगीत कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे असून संगीत मार्गदर्शन स्वप्निल गोरे यांनी केले आहे.
या नाटकात स्वप्निल गोरे, केतकी सावंत, उमा जडये, गुरुप्रसाद चिटणीस, गणेश दीक्षित, तेजस प्रभूदेसाई, शुभम परब आणि बाळ पुराणिक या स्थानिक कलाकारांचा सहभाग आहे. साथसंगत प्रसाद शेवडे (ऑर्गन) व नीरज भोसले (तबला) करणार आहेत. प्रकाशयोजना अभिषेक कोयंडे, पार्श्वसंगीत गणेशप्रसाद गोगटे, रंगभूषा संजय जोशी, तर वेशभूषा वैभवी पुराणिक व प्राजक्ता राणे यांची आहे.
याबाबत बोलताना कार्यकारी निर्माता व दिग्दर्शक बाळ पुराणिक म्हणाले की, नेहरू सेंटरसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर ‘संगीत मत्स्यगंधा’ सादर होणे ही सर्व कलाकारांसह समस्त सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून संगीत नाटकाला नवसंजीवनी देण्याच्या आमच्या प्रयत्नांना या प्रयोगामुळे अधिक बळकटी मिळेल.
चार दिवसांच्या या संगीत नाट्यमहोत्सवाला सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे मुंबईतील नाट्यरसिक तसेच मुंबईत वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्गातील चाकरमान्यांनी आपल्या मित्रमंडळींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री परमेश्वर प्रॉडक्शनच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रयोगासाठी संपर्क : ९४२२४३६१४७
