नाबार्डअंतर्गत प्रस्तावासाठी १५ दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश; सावंतवाडीतील गावांसह रेल्वे स्थानकाचा योजनेत समावेश:केसरकरांच्या मागणीला यश..
⚡सावंतवाडी ता.० ४-: तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजना तसेच तिलारी पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. या दोन्ही योजना नाबार्डच्या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. सावंतवाडीचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या योजनांचे प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून येत्या १५ दिवसांत नाबार्ड योजनेंतर्गत मंजुरीसाठी परिपूर्ण प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
बैठकीस आमदार दीपक केसरकर यांच्यासह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जीवन प्राधिकरण ठाणेचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेलचे अधीक्षक अभियंता, नाबार्ड पुणेचे सहाय्यक महाप्रबंधक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडीतील गावांचा योजनेत समावेश
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, ब्राह्मणपाट, कुंभार्ली, सोनुर्ली, न्हावेली आदी गावांसह सावंतवाडी रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या गावांचा तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजनेत समावेश करून येत्या १५ दिवसांत मंजुरीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या योजनेमुळे किनारपट्टी भागातील गावांना भेडसावणारी पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. विशेषतः मार्च ते मे या कालावधीत या भागातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. प्रस्तावित योजनेमुळे ही समस्या कमी होण्यास हातभार लागणार आहे.
तसेच उद्योगधंदे, हॉटेल व्यवसाय, पर्यटन व्यवसाय यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊन पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यात चिपी विमानतळाच्या विस्ताराच्या दृष्टीनेही या योजनेचा फायदा होणार आहे. याशिवाय सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
केसरकरांच्या पाठपुराव्याला महत्त्वाचे यश
तिलारी प्रकल्पावर आधारित या महत्त्वाकांक्षी पाणी योजनांना नाबार्डच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला या बैठकीमुळे महत्त्वाचे यश मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे सावंतवाडी, वेंगुर्ला आणि चिपी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला कायमस्वरूपी दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
