वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश: आमदार केसरकर यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक संपन्न..
⚡सावंतवाडी ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तसेच मतदारसंघातील ३३ केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याबाबत मंगळवारी मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सावंतवाडीचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार दीपक केसरकर यांच्या विनंतीनुसार एमएसआरडीसी कार्यालय, सातवा मजला, निर्मल भवन, मुंबई येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे), रत्नागिरी व कराडचे मुख्य अभियंते, सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसर मोठ्या प्रमाणात जंगल व झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यात झाडे उन्मळून पडणे, वादळी वाऱ्यामुळे फांद्या विद्युत तारांवर पडणे यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी नागरिकांसह व्यापारी, पर्यटन व्यावसायिक आणि विविध आस्थापनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ३३ केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत आग्रहीपणे मांडली. भूमिगत वाहिन्यांमुळे झाडे व वादळामुळे विद्युत तारांचे होणारे नुकसान, पोल पडणे आणि वाहिन्या तुटण्याच्या घटना कमी होतील. तसेच वीजपुरवठ्यातील वारंवार होणारे व्यत्यय टाळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर तातडीच्या उपाययोजनांबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंतवाडी मतदारसंघातील ३३ केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
