माजी मुख्याध्यापक वाय आर राजूरकर यांचे प्रतिपादन…
मालवण ता.१२-:मालवण दि प्रतिनिधी ज्यांनी आपले जीवन सुसह्य केले अशा आई वडिलांबरोबरच गुरुजनांन विषयी कृतज्ञता प्रत्येकाने आपल्यामध्ये बाळगली पाहिजे तरच आपले जीवन सुजलाम सुफलाम बनेल असे प्रतिपादन भंडारी हायस्कूल मालवणचे माजी मुख्याध्यापक श्री. वाय. आर. राजूरकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलच्या सन १९९०-९१ सालच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर आज संपन्न झाले. त्यावेळी श्री. राजूरकर हे बोलत होते. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी पर्यवेक्षक श्री. रवींद्र वराडकर, माजी शिक्षक जयवंत ढोलम, वडाचापाट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. एन. पाटील, भंडारी हायस्कूलचे पर्यवेक्षक एच. बी. तिवले, श्री. सदानंद पाटकर, श्री. प्रकाश कदम, श्री. ध्रुवकुमार राणडे, ज्युलि फर्नांडिस, माजी मुख्याध्यापिका सुप्रिया टिकम, नेहा साटलकर आदींसह माजी विद्यार्थी सचिन पराडकर, किशोर बांदकर, पुंडलिक कदम, ममता चव्हाण, प्रवीण आंबेरकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी श्री. वाय. आर. राजूरकर यांनी दीपप्रज्वलन करून गेट टुगेदरचे उदघाटन केले तर स्वागत किशोर बांदकर यांनी केले.
यावेळी श्री. राजूरकर यांनी तुम्ही चांगले समाजाला दिले तर समाजही त्याची परतफेड चांगल्या पद्धतीने करतो आणि यातूनच आपला विकास घडतो आनंद हा कधी सहज आणि आपोआप मिळत नाही तर त्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न करावे लागतात. या गेट टुगेदरच्या माध्यमातून सचिन पराडकर, किशोर बांदकर, प्रवीण आंबेरकर, पुंडलिक कदम यासारखे आणि तुम्ही सर्वांनी मिळून जे प्रयत्न केले त्यामुळे हे गेट टुगेदर आनंददायी वातावरणात संपन्न होत आहे असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित माजी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सुजाता शेलटकर, ममता चव्हाण, पुंडलिक कदम यांचा तसेच माजी शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शेवटी सचिन पराडकर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक कदम, बबन मालवणकर यांनी केले. या गेट टुगेदर कार्यक्रमास २८ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
