मालवण ता.१२-:* मालवण मेढा येथील श्री मुरलीधर मंदिरात श्रीकृष्णाची चंदनउटी पूजा रविवारी संपन्न झाली. यावेळी श्रीकृष्णाला वस्त्रालंकार परिधान करून फुलांची आकर्षक आरास करून पूजा अर्चा करण्यात आली. तसेच यानिमित्त आंबा महोत्सव साजरा करून मूर्तीसमोर आंब्यांची आरास करण्यात आली होती. वैशाख महिन्यातील उन्हाळ्यामध्ये भगवंताला शांतता मिळावी म्हणून पूजेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती पुरोहित दर्शन वझे यांनी दिली. या पूजेचे यावर्षी तिसरे वर्ष होते.
या पूजेनिमित्त सायंकाळी मंदिरात भजन सेवा संपन्न झाली. यात दर्शन वझे, दिव्या आपटे, ऍड. पलाश चव्हाण, रविना पांजरी यांनी विविध भक्तीपूर्ण भजने सादर केली. त्यांना हार्मोनियम अक्षय सातार्डेकर व प्रतीक कोथीवडेकर, तबला- वैभव मांजरेकर यांची संगीतसाथ लाभली. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून श्रीकृष्णाचे दर्शन घेत भजनांचा आस्वाद घेतला.
