Headlines

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही; उच्चशिक्षित होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा…

प्रा. एम. व्ही. कुलकर्णी यांचे प्रतिपादन; तळवडे जनता विद्यालयात ‘मधुकरराव बुगडे स्मृती व्याख्यानमाले’चा उत्साहात प्रारंभ..

⚡सावंतवाडी, ता.०३- : “आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेचा अभ्यासक्रम निवडला तरी उच्चशिक्षित होण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि विद्यार्थी ते नक्कीच करतील,” असा विश्वास श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक प्रा. एम. व्ही. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मधुकरराव तथा अण्णासाहेब बुगडे स्मृती व्याख्यानमाले’च्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
व्याख्यानमालेचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच सरस्वती देवी आणि मधुकरराव तथा अण्णासाहेब बुगडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाले.
यावेळी युवराज लखमराजे भोसले यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनाचे कौतुक केले. “शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेचा हा स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी चाकोरीबद्ध शिक्षणाच्या वाटांबरोबरच शिक्षणाच्या नव्या वाटाही चोखाळणे आवश्यक आहे. शिक्षण संस्थेने अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत. त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते युवराज लखमराजे भोसले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र कांडरकर यांच्या हस्ते प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, तर सचिव दादा पेडणेकर व खजिनदार सुरेश गावडे यांच्या हस्ते अभिनव अकादमीचे संचालक विलास पोळ यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विषयांची सखोल समज, लेखनकौशल्य आणि प्रात्यक्षिक ज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. डॉ. जी. एस. मर्गज यांनी ‘प्राण्यांचे वर्गीकरण’, तर प्रा. व्ही. पी. राठोड यांनी ‘लेखन कौशल्ये’ या विषयावर गुंफले.
यासोबतच विज्ञान विषयांच्या विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. रसायनशास्त्र विभागात दैनंदिन जीवनातील अन्नपदार्थांमधील भेसळ ओळखणे, दुधाचे विश्लेषण, माती व पाण्याचा सामू (pH) निश्चित करणे, श्यानता मोजणे, विविध उपकरणांचा वापर, धातुक व मिश्रधातू आदींची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
प्राणिशास्त्र विभागात सूक्ष्मदर्शकाचा वापर, सरपटणारे प्राणी, उभयचर, पक्षी व सस्तन प्राणी तसेच प्रवाळ, मृदुकाय, कंटकचर्मी व वलयकृमी यांसारख्या अपृष्ठवंशी प्राण्यांच्या नमुन्यांचे प्रदर्शन करण्यात आले. भौतिकशास्त्र विभागात भिंगे, व्हर्निअर कॅलिपर्स, मायक्रोमीटर स्क्रू गेज, मल्टीमीटर तसेच सौर पॅनेल यांवरील प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.
व्याख्यानमालेचे पुढील वेळापत्रक : सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी प्रा. डी. डी. गोडकर यांचे ‘मूलद्रव्यांचे आवर्त वर्गीकरण’; मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी श्री. बाळकृष्ण राणे यांचे ‘विद्युत प्रवाहाचे परिणाम’; बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ. व्ही. पी. सोनळकर यांचे ‘संभाव्यता’; गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ. डी. बी. शिंदे यांचे ‘कार्बन संयुगांचे रसायनशास्त्र’; शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी डॉ. एस. व्ही. पाटील यांचे ‘ऊर्जास्रोत व प्रकाशशास्त्र’; तर शनिवार, १० ऑक्टोबर रोजी श्री. संतोष व्ही. सावंत यांचे ‘भूमितीय रचना’ या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
सर्व व्याख्याने सकाळी ९ ते १०.४५ या वेळेत श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत. अभ्यासक्रमातील संकल्पना प्रयोगांच्या माध्यमातून समजून घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व विषयाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासाठी ही व्याख्यानमाला आणि प्रात्यक्षिके उपयुक्त ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे तसेच श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सल्लागार प्रा. दिलीप गोडकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी मानले, तर सूत्रसंचालन शिक्षक प्रसाद आडेलकर यांनी केले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page